गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या नव्या अभासक्रमात प्रसिद्ध लेखक प्रा.शरद बाविस्कर यांचे बहुचर्चित आत्मचरित्र ‘भुरा’ चंद्रकांत वानखेडे लिखित ‘आपुलाची वाद आपुणांसी’ सह चार आत्मचरित्राचा मराठी विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात ‘ऐच्छिक अभ्यास पत्रिका २ -आत्मचरित्र’मध्ये समावेश करण्यात आला आहे.
शिक्षणातील तत्त्वज्ञान आणि समकाळाचे व्यापक भान देणारी कलाकृती म्हणून प्रा. शरद बाविस्कर यांचे बहुचर्चित आत्मचरित्र ‘भुरा’कडे बघितले जाते. या आत्मचरित्रासह गोंडवाना विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेच्या चळवळीतील अनुभवाचे, मेटीखेडा येथील कृषी जीवनाच्या विविध मूल्यात्मक प्रयोगाच्या अनुभवावर आधारित राजकीय मूल्यभान देणारी कलाकृती ‘आपुलाची वाद आपणासी ‘ सिंधुताई सपकाळ यांचा संघर्ष आणि सामाजिक कामाचा पट उलगडणारे ‘मी वनवासी, ‘हंसा वाडकर यांचे ‘सांगते ऐका ‘ हिम्मतराव बाविस्कर यांचे ‘बॅरिस्टर कार्ट’ आणि प्रकाश आमटे यांचे ‘प्रकाशवाटा’चा समावेश केला आहे. दृष्टिकोन समृद्ध करणाऱ्या या आत्मचरित्रांचा अभसक्रमात समावेश केल्याने शैक्षणिक वर्तुळातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. तर अमरावती पाठोपाठ ‘भुरा’चा गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाल्याने प्रा. शरद बाविस्कर यांनी समाजमाध्यमावर आभार व्यक्त केले आहे.