चंद्रपूर : अडीचशे कोटींची अमृत पाणीपुरवठा योजना अपूर्ण असताना या योजनेचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. चंद्रपूरवासीयांना पाणी मिळत आहे, अशी चुकीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली.मुख्यमंत्री विधान परिषदेत खोटे बोलले, असा आरोप आता नागरिकांकडून केला जात आहे. अमृत योजनेचे कंत्राटदार संतोष मुरकुटे हे भाजपचे पदाधिकारी असून नुकतीच त्यांची परभणी ग्रामीण जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामुळेच अशी दिशाभूल करणारी माहती दिल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांवर होत आहे.
सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेल्या अमृत पाणीपुरवठा योजनेबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. अमृत योजनेचे काम सुरू करण्यापूर्वी विविध परवानग्या मिळण्यास वेळ लागल्याने तसेच करोना महामारीमुळे योजना पूर्ण करण्यास विलंब झाला तसेच सदर योजनेचे भौगोलिकदृष्ट्या ९५ टक्के काम पूर्ण झालेले असून शहरातील ९५ टक्के भागात अमृत योजनेचा पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.शहरातील १५ झोनमध्ये अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, २०१९ मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित होते. करारात नमूद असलेला कामाचा अवधी संपल्यानंतर करोनाची साथ आली. त्यामुळे विविध परवानगी मिळण्यास वेळ लागल्याने किंवा करोनामुळे काम करण्यास विलंब झाला, ही माहिती चुकीची आहे. कारण, करोनापूर्वीच काम होणे अपेक्षित असतानाही २०२३ पर्यंत काम पूर्ण झालेले नाही. अमृत योजनेअंतर्गत काम करण्याकरिता शहरात १६ झोन तयार करण्यात आले. या १६ झोनमध्ये ८ जुन्या व ८ नवीन अशा एकूण १६ पाण्याच्या टाकी आहेत. यापैकी बंगाली कॅम्प येथील टाकीतून अमृत योजनेचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही.
हेही वाचा >>>प्रेयसीला तिचा पती मारत असल्याचे खटकले म्हणून प्रियकराने…
हेही वाचा >>>नागपुरात काय सुरू आहे ? खंडणी दिली नाही म्हणून दुकानदारावर गोळीबार
इथे जुन्या पाईपलाईनमधून तीन ते चार हजार नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. घुटकाळा येथील टाकीवरून जवळपास चार ते पाच हजार नागरिकांना जुन्या पाईपलाईनने पाणीपुरवठा होत आहे. या टाकीवरून अमृत पाणीपुरवठा योजनेची चाचणी पूर्ण झालेली नाही. ८० टक्के घरांना नळजोडणी झाली असून अद्यापही २० टक्के घरांना नळ जोडणी झालेली नाही. नळ जोडणीच झालेली नसल्याने शहरातील ९५ टक्के नागरिकांना अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा सुरू झाल्याची मुख्यमंत्र्यांनी दिलेली माहितीसुद्धा चुकीची असल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिली.