उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गेल्या तीन वर्षांची तुलना केल्यास बाह्यरुग्णसंख्या वाढली, परंतु आंतररुग्णसंख्या घसरली. तर येथे उपचार घेणाऱ्या कर्करोग, नवजात मृत्यूंमध्ये मोठी वाढ झाल्याचे माहितीच्या अधिकारात पुढे आली आहे.
हेही वाचा- नागपूर : कचऱ्याच्या डब्यांचाच ‘कचरा’ !
मेडिकलमध्ये २०२० मध्ये कर्करोगाचे ४९ रुग्ण दगावले. २०२१ मध्ये ३१ रुग्ण तर २०२२ मध्ये १७३ रुग्णांचा मृत्यू झाला. तर येथे २०२० मध्ये २०५ नवजात बालकांचा मृत्यू, २०२१ मध्ये १७६ मृत्यू तर २०२२ मध्ये तब्बल २३७ नवजात मृत्यू नोंदवले गेले. तर येथे २०२० मध्ये ५ लाख २२ हजार ३८२ बाह्यरुग्णांची नोंद झाली. २०२१ मध्ये ५ लाख ९८ हजार ५०६ आणि २०२२ मध्ये ६ लाख २० हजार ९१४ बाह्यरुग्ण येथे उपचाराला आले. तर गंभीर संवर्गातील मेडिकलला २०२० मध्ये ६० हजार २४३, २०२१ मध्ये ५२ हजार ४३१, २०२२ मध्ये ५० हजार ८१९ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी उपचारादरम्यान २०२० मध्ये ७ हजार ४४१, २०२१ मध्ये ७ हजार ३८८, २०२२ मध्ये ५ हजार ४११ रुग्णांचा मृत्यू झाल्याचेही माहितीच्या अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले.
हेही वाचा- नागपूर : आंबेडकर भवन प्रकरणी गजभियेंकडून जनतेची दिशाभूल, नरेंद्र जिचकार यांची टीका
४० कोटींचा निधी गेला कुठे?
मेडिकलला १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ दरम्यानच्या काळात राज्य सरकार, आमदार निधी, जिल्हा नियोजन समिती, सामाजिक न्याय व आदिवासी विभाग, जिल्हा खनिकर्म महामंडळसह इतर विभागाकडून ४० कोटी ९ लाख ५६ हजार ३४७ रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. त्यापैकी हाफकीनला १ कोटी १७ लाख ९८ हजार ८२० रुपये विविध यंत्रासाठी वर्ग केले गेले. परंतु अद्यापही यंत्र मिळाला नसल्याचेही माहितीच्या अधिकारातून कोलारकर यांनी पुढे आणले. तर इतरही निधीतून मेडिकलला यंत्र आले नसल्याचेही माहितीच्या अधिकारातून दिसत आहे.