अकोला : भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीतील सक्षमीकरणासाठी हाती घेतलेल्या मिशन तीन हजार मेट्रिक टन योजनेंतर्गत भुसावळ विभागाची कामगिरी उत्तम ठरली. यांत्रिक विभागात मालगाडी परीक्षण यार्ड आणि ‘आरओएच डेपो’मध्ये मालवाहतूक वॅगनची देखभाल व परीक्षण वेगाने पूर्ण केल्याने मालगाड्यांची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता वाढली आहे.

भुसावळ कॅरेज आणि वॅगन विभागाने मालगाड्यांच्या देखभालीत ऐतिहासिक टप्पा गाठला. मार्च २०२५ मध्ये सर्वाधिक एकूण ७०२ वॅगनचे आरओएच यशस्वीरीत्या पूर्ण केले. ही संख्या फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या ५२१ वॅगनच्या तुलनेत ३४.७ टक्के अधिक असून, मार्च २०२४ मध्ये झालेल्या ४४१ वॅगनच्या तुलनेत ५९.१ टक्के वाढ झाली.

भुसावळ विभागातील ‘कंटिन्युअस चेक’ (सी.सी.) मालगाडी रेक संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मार्च २०२४ मध्ये १३३ असलेली सी.सी. मालगाडी रेक संख्या मार्च २०२५ मध्ये २३८ वर पोहोचली. त्यात ७८.९४ टक्के वाढ दर्शवते. त्यामुळे मालगाड्या मालवाहतुकीसाठी उपलब्ध होऊन रेल्वेच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली. वर्ष २०२४-२५ मध्ये एकूण १६८९ सी.सी. मालगाडी रेक परीक्षण पूर्ण केले. याच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये १२७१ सी.सी. रेक परीक्षण झाले. ही वाढ ३२.८८ टक्के अधिक आहे. रेल्वे वाहतूक सुधारण्यासोबतच उत्पन्नात भर घालून मालवाहतूक वॅगनच्या देखभालीत नवीन मापदंड प्रस्थापित करण्यास मदत झाली.

स्वयंचलित सिग्नल प्रणालीसाठी विशेष ब्लॉक

भुसावळ विभागामार्फत बडनेरा-शेगाव खंडातील बडनेरा ते कुरुम स्थानकांदरम्यान अप व डाउन लाईनवर स्वयंचलित सिग्नल प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी पूर्व-नॉन इंटरलॉकिंग व नॉन-इंटरलॉकिंग विशेष ब्लॉक घेतला जात आहे. या अंतर्गत ३ एप्रिल (गुरुवार) रोजी नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक कार्यान्वित करण्यात येईल. गाडी क्रमांक ६१११५ बडनेरा ते अमरावती मेमू, गाडी क्रमांक ६११०७ अमरावती ते वर्धा मेमू, गाडी क्रमांक ६११०८ वर्धा ते अमरावती मेमू, गाडी क्रमांक ६१११६ अमरावती ते बडनेरा मेमू ३ एप्रिल रोजी रद्द कऱण्यात येत आहे. गाडी क्रमांक ,६११०६ नरखेड ते बडनेरा मेमू आपल्या नियोजित वेळेपेक्षा नरखेड ९० मिनिटे उशिरा सुटेल. गाडी क्रमांक ६११०२ बडनेरा ते भुसावळ मेमू नियोजित वेळेपेक्षा बडनेरा येथून ९० मिनिटे उशिरा सुटणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. रेल्वेच्या या ब्लॉकमुळे प्रवाशांची चांगलीच अडचण होत असल्याचे दिसून येते.