नागपूर : सरळसेवा भरतीच्या शुल्कवाढीवरून राज्यातील स्पर्धा परीक्षार्थी आधीच संतापले असताना आता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) सामायिक प्रवेश परीक्षांच्या (सीईटी) शुल्कामध्ये २०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यावरुन टीका होत आहे.विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहेत. या प्रवेश परीक्षांच्या नोंदणीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार आता १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुकला, विधी, डिझाईन, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. मात्र, यंदा सीईटी सेलने परीक्षा शुल्कामध्ये वाढ केल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. राज्यात सुरू असलेल्या सरळसेवा भरतीमध्ये एका परीक्षेसाठी एक हजार रुपये शुल्क वसूल केले जात आहे. यामुळे परीक्षार्थीमध्ये आधीच नाराजी आहे. विरोधी पक्षाच्या अनेक आमदारांनीही यावरून टीका केली. सरकार खासगी कंपन्यांच्या नफ्यासाठी शुल्कवाढ करत असल्याचा आरोपही करण्यात आला. आता पुन्हा सीईटी परीक्षा शुल्कामध्येही वाढ करण्यात आली आहे.
हेही वाचा >>>भोंदू गुरूदासबाबावर बलात्काराचा आरोप, मध्यप्रदेशातून अटक
समूहासाठी अर्ज करताना १६०० रुपये मोजा
गतवर्षी सीईटीसेलतर्फे खुल्या प्रवर्गासाठी आणि महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांकरिता ८०० रुपये तर सर्व राखीव प्रवर्गासाठी ६०० रुपये शुल्क होते. यंदा खुल्या प्रवर्गासाठी १००० रुपये तर सर्व राखीव प्रवर्गासाठी ८०० रुपये करण्यात आले आहे. पीसीएम आणि पीसीबीकडून यापूर्वी एकत्र अर्ज करताना १००० रुपये घेतले जात होते. आता या दोन समूहासाठी अर्ज करताना १६०० रुपये मोजावे लागत आहेत.
विद्यार्थी म्हणजे शासनाची तिजोरी भरण्याचे साधन नाही. त्यामुळे सरकारने शुल्क वाढवण्यापेक्षा विद्यार्थ्यांना अधिक सवलती कशा देता येतील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सीईटी परीक्षेसाठी शुल्कवाढ केल्याने सामान्यांना याचा मोठा फटका बसत आहे. – उमेश कोर्राम, स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया.