नागपूर: अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राज्य समाईक प्रवेश परीक्षेत (एमएचटी-सीईटी) पीसीबी आणि पीसीएम गटातील मिळून ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले आहेत. गेल्या वर्षी २८ जणांना १०० पर्सेंटाइल होते. राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) रविवारी निकाल जाहीर झाला.

यंदा एमएचटी-सीईटीच्या निकालातील गुणांच्या वाढीमुळे यंदा राज्यातील इंजिनीअरिंग, फार्मसी व्यावसायिक अभ्यासक्रमांचा कटऑफ चांगलाच वाढणार आहे. त्यामुळे अभियांत्रिकीच्या रिक्त जागा कमी होणार असून प्रवेशासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. सीईटी सेलने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, यंदा खुल्या प्रवर्गातील १८ विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेंटाइलसह प्रथम क्रमांक मिळवला. ओबीसी प्रवर्गात शंभर पर्सेंटाइलसह आठ विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अनुसूचित जाती प्रवर्गात मुंबईच्या परेश क्षेत्री, नागपूर येथील सना वानखेडे, अनुसूचित जमाती प्रवर्गात अकोला येथील सृजन अत्राम, रांची येथील सुयांश चौहान, विमुक्त जाती प्रवर्गात नाशिक येथील रिहान इनामदार, रांची येथील मंथन जाधव, भटक्या जमाती (ब) प्रवर्गात कोल्हापूर येथील सलोनी कराळे, पुणे येथील देवेश मोरे, भटक्या जमाती (क) प्रवर्गात ओम गोचाडे, वर्धा येथील प्रणव गावंड, भटक्या जमाती (ड) प्रवर्गात वर्धा येथील आराध्या सानप, जयपूर येथील समृद्धी ओंबासे अग्रस्थानी आहेत.

हेही वाचा – बुलढाणा : कडेकोट बंदोबस्तात पोलीस भरतीला प्रारंभ; गुप्तचर, एसीबी अन्…

यंदा एमएचटी-सीईटीत ३७ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल मिळविण्याची कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी हा आकडा २८ होता. केवळ १०० पर्सेटाईलच नव्हे, तर १० ते ९९.९९, ८० ते ८९.९९, ७० ते ७९.९९, ६० ते ६९.९९ अशा वरच्या श्रेणीत पर्सेटाईल मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही यंदा लक्षणीय वाढ झाली आहे. ही वाढ पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही विषयगटांत आहे. त्यामुळे इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषी या अभ्यासक्रमांचा प्रवेशाचा कटऑफ यंदा चांगलाच वधारणार आहे. वरच्या श्रेणीतील काही विद्यार्थ्यांनी केंद्रीय किंवा अन्य शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा गुणांचा फुगवटा इतका जास्त आहे की, कटऑफ वधारलेला राहील. यंदा पीसीबीच्या २,९५,५७७ आणि पीसीएमच्या ३,७९,८०० अशा एकूण ६,७५,३७७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

हेही वाचा – “काँग्रेसने पुन्हा एकदा इंग्रजांचा काळ आणला,” चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका; म्हणाले, “नाना पटोलेंनी…”

या शाखांमध्ये चढाओढ राहणार

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत लाखभर तरी वाढ झाली आहे. त्यात निकाल फुगल्यामुळे ठरावीक विषयांमध्ये प्रवेशासाठी मोठी चढाओढ पाहायला मिळेल. इंजिनीअरिंगच्या काही प्राचार्यांच्या मते मात्र वरच्या पर्सेटाईलमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने प्रवेशाच्या कट-ऑफवर फारसा परिणाम होणार नाही. कारण, कॉम्प्युटर सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी यांसारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमतेत झालेली मोठी वाढ.