महेश बोकडे, लोकसत्ता
नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी संख्येत गेल्या तीन वर्षांत तिपटीहून जास्त वाढ झाली आहे. सोबतच अपघातांच्या संख्येमध्येही दुपटीहून जास्त वाढ झाली आहे. माहिती अधिकारांतर्गत हा तपशील समोर आला आहे.
१ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ दरम्यान ३३ कोटी २० लाख २२ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने एसटीला १ हजार ४६३ कोटी ७५ लाख ३१ हजार रुपयांचा महसूल मिळाला. २०२१-२२ या आर्थिक वर्षात ४९ कोटी ५५ लाख ४३ हजार प्रवाशांमुळे २ हजार ५३५ कोटी ५४ लाख ३४ हजार, २०२२- २३ मध्ये १५९ कोटी ७९ लाख ९२ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने ७ हजार ४१० कोटी २८ लाख ७८ हजार तर २०२३-२४ (फेब्रुवारी २०२४ पर्यंत) १८६ कोटी १२ लाख ७ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने ९ हजार १५६ कोटी २१ लाख ८१ हजार रुपयांचा महसूल एसटीला मिळाला.
आणखी वाचा-उमेदवारांची भाऊगर्दी, अतिरिक्त बॅलेट युनिट जोडावे लागेल… वाचा कुठे घडला हा प्रकार?
जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ दरम्यान ६२९ घडलेल्या बस अपघातांमध्ये ७१ मृत्यू झाले. २०२१-२२ मध्ये १ हजार २८१ अपघातांमध्ये १५९ मृत्यू, २०२२-२३ मध्ये ३ हजार १४ अपघातांमध्ये ३४३ मृत्यू झाले. २०२३-२४ (फेब्रुवारी २०२४ पर्यंत) ३ हजार १२१ अपघातांमध्ये ३८० मृत्यू नोंदवले गेल्याचेही सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून पुढे आणले आहे.
सवलत योजनेमुळे महिला प्रवासी वाढल्या
शासनाने महिला सन्मान योजनेंतर्गत प्रवास शुल्कात महिलांना ५० टक्के सवलत दिली. योजना सुरू झाल्यापासून १७ मार्च २०२३ ते ३१ मार्च २३ दरम्यान १ कोटी ८६ लक्ष ४९ हजार महिलांनी प्रवास केल्याने एसटीला सवलत मूल्यांसह ९९ कोटी ६० लाख १८ हजारांचा महसूल मिळाला. २०२३- २४ (फेब्रुवारी २०२४ पर्यंत) मध्ये ५४ कोटी १३ लक्ष महिलांनी प्रवास केल्याने एसटीला ३ हजार ११० कोटी ९८ लाख ४२ हजार रुपयांचा महसूल मिळाल्याचेही माहिती अधिकारातून पुढे आले.