अमरावती: शहरासह जिल्ह्यात अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली असून गेल्या ४८ तासांत चिखलदरा, वरूड आणि आसेगाव पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातांमध्ये तीन जण ठार झाले. ग्रामीण भागात वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना अपघात रोखण्यासाठी केव्हा उपाययोजना राबविणार असा प्रश्न विचारला जात आहे.
जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षांत विविध अपघातांमध्ये सुमारे १०७९ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यात एकूण १३९ अपघातप्रवण स्थळांची नोंद करण्यात आली आहे. या ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज आहे. जिल्ह्यात वाहनांची संख्या वाढली. पण, रस्ते सुरक्षा उपायांकडे लक्ष न देण्यात आल्याने अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यात गेल्या साडेदहा महिन्यांत ६१० रस्ते अपघातांमध्ये २३५ जणांचा जीव गेला आहे.
हेही वाचा… नागपूर: सोन्याचे बिस्कीट घेऊन ग्राहकाकडे गेलेला कर्मचारी पळाला
२०२१ मध्ये अमरावती जिल्ह्यात ९३३ अपघातांची नोंद झाली, त्यात ३७ जणांचा बळी गेला होता. २०२२ मध्ये ११०९ अपघातांमध्ये ४५५ जणांना प्राण गमवावे लागले, तर २०२३ मध्ये आतापर्यंत ६१० अपघातांची नोंद झाली आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी जिल्ह्यातील १३९ अपघातप्रवण स्थळी तत्काळ उपाययोजना राबविण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला काही महिन्यांपुर्वी सुमारे १५० पानांचा सविस्तर अहवाल पाठवला आहे. पण, उपाययोजना संथ गतीने राबविण्यात येत आहेत. शासन निर्देशानुसार जिल्ह्यातील रस्ते अपघातांवर नियंत्रणासाठी वाहतूक पोलीस, परिवहन आणि विविध सामाजिक संस्थांच्या समन्वयातून दर वर्षी रस्ते सुरक्षा मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेदरम्यान वाहनचालकांसह सामान्य नागरिकांना वेळोवेळी मार्गदर्शनदेखील केले जाते. असे असूनही अपघातांचे प्रमाण कमी झालेले नसून ते दिवसेंदिवस वाढत आहे.
हेही वाचा… ग्रेट व्हाईट नागपुरात विद्युत साहित्य निर्मिती प्रकल्प उभारणार; ३०० कोटींची गुंतवणूक
रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करण्यासह वेगावर नियंत्रण नसणे, ओव्हरटेक करताना, सीट बेल्टस नसणे, हेल्मेटचा वापर न करणे, विरूद्ध दिशेने जाणे, टायरमधील हवेचे प्रमाण यासह अति आत्मविश्वास तसेच लहान मोठ्या वाहनांचे प्रखर हेडलाईटस आदी कारणांमुळे अपघात झाले आहेत. अनेक ठिकाणी महामार्गावरील दुभाजक फोडून अनेक दुचाकीस्वार तेथून रस्ता ओलांडतात. महामार्गांवर अनेक ठिकाणी महामार्ग पोलीस, स्थानिक पोलीस असतात, तरीदेखील वाहनांचे अपघात कमी झालेले नाहीत. रस्त्यांवर जनजागृतीपर फलक दिसत नाहीत. महामार्गावर वाहन बंद पडल्यानंतर दोन दिवस तसेच असते. रस्त्यांलगत असलेली लोखंडी संरक्षक जाळी तुटल्याने अनेक जनावरे महामार्गावर येतात. अशा अनेक अडचणी असतानाही त्यावर तोडगा काढला जात नाही. महामार्गांवरील खड्डे, तुटलेले दुभाजक, वापरण्यायोग्य नसलेला सर्व्हिस रोड, महामार्गावर उभारलेली मोठी वाहने, त्या अपघातास कारणीभूत ठरली आहेत.
अपघाताची कारणे
वाहन वेगाने चालवणे, रस्त्यांची नादुरुस्ती, वाहतुकीच्या नियमांचे फलक नसणे, गतिरोधक नसणे, दुचाकी, चारचाकी चालवताना मोबाईलवर बोलणे, वाहतुकीचे नियम न पाळणे, सिटबेल्टचा वापर न करणे, अतिवेगाने वाहन चालवणे, वाहनाला ओव्हरटेक करणे