लोकसत्ता टीम
नागपूर : उपराजधानीत डेंग्यू नियंत्रणात येत नसतानाच रुग्णसंख्या चारशेहून पुढे गेली आहे. नागपूर महापालिकेकडे डेंग्यू तपासणी ‘किट्स’ संपल्याने तपासणी बंद पडली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचा वाली कोण, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत आवश्यक संख्येने डेंग्यू तपासणी ‘किट्स‘ असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावेळी महापालिकेकडे केवळ १० ‘किट्स‘ उपलब्ध होत्या. तर एका किट्समधून ९८ तपासणी होत असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले होते. यावेळी लोकसत्ताने ‘किट्स‘चा तुटवडा असल्याचे पुढे आणले होते.
आणखी वाचा-राज्यात आठ हजार रुग्ण बुब्बुळाच्या प्रतीक्षेत, ‘एचसीआरपी’ कार्यक्रम कागदावरच!
डेंग्यू तपासणी ‘किट्स‘ नसल्याने आता नागपूर महापालिकेच्या दटके रुग्णालयातील प्रयोगशाळेत तपासणी बंद झाली असून नमुने जमा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तर मेडिकल, मेयो या शासकीय रुग्णालयांतील प्रयोगशाळेतही ‘किट्स‘चा तुटवडा असल्याने रुग्णांमधील आजाराचे निदान होणार कसे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरात डेंग्यू संशयितांची संख्या ४ हजार १८१ रुग्णांवर पोहचली असून त्यापैकी ४०४ रुग्णांमध्ये डेंग्यूचे निदान झाले आहे. एकूण डेंग्यूच्या रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण हे गेल्या दोन महिन्यातील आहे. त्यामुळे एकीकडे डेंग्यू नियंत्रणाबाहेर असतानाच दुसरीकडे ‘किट्स‘ नसल्याने उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या शहरात चालले काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या विषयावर महापालिकेतील हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. मंजूषा मठपती यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या शहरात डेंग्यूची स्थिती नियंत्रणात असून रुग्णांसाठी सर्व आवश्यक औषधी रुग्णालयात उपलब्ध केल्याचे सांगितले. तूर्तास डेंग्यू तपासणी ‘किट्स‘ संपल्या असल्या तरी लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संशयित रुग्णांच्या आजाराच्या निदानाला विलंब होऊ नये म्हणून काळजी घेतली जात असल्याचा दावा केला.
खासगी केंद्रातील तपासणीला मान्यता नाही
नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून खासगी रुग्णालयांसह खासगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या व एनएच १ मध्ये सकारात्मक अहवाल आलेल्या रुग्णाला डेंग्यूच्या गटात टाकले जात नाही. या रुग्णाची ‘एलायझा’ चाचणी केल्यावर ती सकारात्मक आल्यास त्याला डेंग्यूत तर नकारात्मक आल्यास इतर आजारात गणल्या जाते. त्यामुळे नागपूर महापालिका एकीकडे खासगी तपासणी अहवाल मानत नसताना दुसरीकडे त्यांच्याकडे ‘किट्स‘ नसल्याने शहरात नवीन गोंधळ निर्माण झाला आहे.
खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत चौपट वाढ
डेंग्यू सदृश्य आजाराचा प्रकोप असल्याने नागपुरातील शासकीय प्रयोगशाळेत तपासणी वाढली असतानाच दुसरीकडे खासगी प्रयोगशाळेतही पूर्वीच्या तुलनेत चौपट तपासणी वाढल्या आहेत. त्यात डेंग्यूशी संबंधित एनएस १, ॲन्टीजीन, आयजीजी, आयजीएम या तपासणीसह रक्ताच्या सीबीसी आणि एलएफटी तपासणीही वाढल्या आहेत. सीबीसी तपासणीत रुग्णाच्या ‘प्लेटलेट’चे ‘काऊंट’ तपासले जातात.