चंद्रशेखर बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागच्या  वर्षी करोना टाळेबंदीमुळे गावाकडे परतलेल्या स्थलांतरित मजुरांच्या हाताला काम देणाऱ्या मनरेगाने (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना)  याही वर्षी टाळेबंदीपूर्वीच परतलेल्यांना कामे उपलब्ध करून दिली. त्यामुळे  राज्यातील  दहा जिल्ह्यात मनरेगांच्या कामांवरील मजुरांच्या संख्येत एकाच आठवड्यात सात हजार आठशेहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे.

महात्मा  गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या १२ एप्रिल २०२१ च्या अहवालानुसार, राज्यात  १० एप्रिल २०२०१ रोजी संपलेल्या आठवड्यात मनरेगावरील मजुरांच्या संख्येत मागील आठवड्याच्या तुलनेत ७,८९४ ने वाढ झाली आहे. ३ एप्रिलला संपलेल्या  आठवड्यात राज्यात मनरेगाच्या ३२,३३३ कामांवर एकू ण १ लाख ९७ हजार २६ मजूर काम करीत होते. त्यानंतरच्या आठवड्यात (१० एप्रिलला संपलेल्या) ही संख्या २ लाख ४ हजार ९२० वर गेली. मजुरांची ही वाढ राज्यातील  एकू ण दहा जिल्ह्यामध्ये  नोंदवण्यात आली असून त्यात विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, कोकणातील  पालघर, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, मराठवाड्यातील  लातूर, जालना, उस्मानाबाद, परभणी आणि औरंगाबाद जिल्ह््यांचा समावेश आहे. या खालोखाल आणखी  आठ जिल्ह्यात मजूर संख्येत वाढ झाली आहे.

उन्हाळ्यात म्हणजे मे महिन्यानंतर मनरेगाच्या कामावर मजुरांची संख्या वाढते. कारण या काळात शेतातील कामे बंद असतात. त्यामुळे तेथील मजूर हे मनरेगाच्या कामावर जात असतात. मात्र मागच्या वर्षी करोना टाळेबंदी  मार्च महिन्यात लागू करण्यात आल्याने  मोठ्या प्रमाणात मजूर आणि कामगारांचे स्थलांतरण सुरू झाले होते. यापैकी बहुतांश जणांनी गावात गेल्यावर मनरेगाच्या कामावर जाणे पसंत के ले. त्यामुळे जूननंतर  मनरेगाच्या कामावरील मजुरांच्या संख्येत वाढ नोंदवली होती.  यंदाही तिच स्थिती पुन्हा निर्माण झाली आणि मनरेगा पुन्हा त्यांच्या मदतीला धावून आली. नोव्हेंबर २०२० नंतर संसर्ग कमी झाल्यावर मूळ गावी परतलेले मजूर व कामगार पुन्हा कामासाठी शहरात गेले. मात्र  पुन्हा करोनाने  तोंड वर काढले. नागपूर, मुंबई, पुणे या  महानगरांची स्थिती भयावह आहे. त्यामुळे टाळेबंदी लागू होण्याआधीच मजूर आपल्या गावी  परतू लागले  होते. त्यांनी पुन्हा मनरेगाच्या  कामावर जाणे पसंत के ल्याचे मजूर संख्येत झालेल्या वाढीमुळे दिसून येते.

राज्य शासनाने १५ एप्रिलपासून पुन्हा टाळेबंदी लागू के ली आहे. यावेळी उद्योग, व्यवसाय सुरू राहणार असले तरी करोनामुळे रोज मोठ्या संख्येने लोक मृत्युमुखी पडत असल्याने व उपचार सुविधा शिल्लक नसल्याच्या भीतीने मजूर स्थलांतरित होऊ लागले आहेत. सध्या  सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू असल्याने ते त्याद्वारे गावी परत जात आहेत. मागच्या वर्षी त्यांना पायपीट करावी  लागली होती.

करोना काळातही आम्ही आवश्यक ती काळजी घेऊन कामे सुरू करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. त्यानुसार कामाची संख्याही टप्प्याटप्प्याने वाढत आहे. मनरेगाच्या  कामावर येणारे सर्व स्थलांतरितच आहेत, असे म्हणता येणार नाही. पण एका आठवड्यात नोंदवण्यात आलेली मजुरांची वाढ ही स्थलांतरितांची असू शकते.

– मारोती चपळे,  उपायुक्त, मनरेगा.