नागपूर: शहरात रस्ते अपघातात दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या सहा महिन्यात ५७६ अपघात झाले. त्यात १४१ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांमध्ये तब्बल ६०६ जण जखमी झाले आहेत. वाहतूक नियमांचे पालन न करणे आणि वाहन चालवताना अतिघाई करणे, ही अपघाताची कारणे असल्याची महिती पोलिसांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उन्हाळा आणि हिवाळा या दोन्ही ऋतूपेक्षा पावसाळ्यात सर्वाधिक अपघात होतात, असे आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यासाठी शहरातील कच्चे रस्ते आणि रस्त्यांची वाईट स्थिती जबाबदार आहे. अनेक रस्त्यांवर हॉटेलचालक घाण पाणी टाकतात तर भाजी बाजारजवळ रस्त्यावर सडलेला भाजीपाला टाकला जातो. हे रस्ते वाहन चालवण्यासाठी धोकादायक असतात. सिमेंटच्या रस्त्यावर माती साचल्यास चिखल तयार होतो. त्यावरून वाहन घसरून सर्वाधिक अपघात होत असतात.

हेही वाचा… रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे: काही मिनिटांत दिवाळीतील रेल्वे आरक्षण फुल्ल; १२० दिवस आधीच ‘वेटिंग लिस्ट’

जानेवारी ते जून या सहा महिन्यांत शहरात ५०२ अपघात झाले असून त्यात ११६ जणांचा मृत्यू झाला. ५५० हून अधिक जखमी झाले. इच्छितस्थळी पोहचण्यासाठी प्रत्येक वाहनचालक धडपड करीत असतो. मात्र, अनेकदा वेगाने आणि घाईने वाहन चालवल्यामुळे अपघात होतात. शहरातील कोतवाली, महाल, कॉटन मार्केट चौक, सक्करदरा ते तिरंगा चौक, रामेश्वरी रोड, तुकडोजी पुतळा ते क्रीडा चौकापर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीची कामे सुरू असल्यामुळे रस्त्यावर चिखल आहे.

हेही वाचा… नागपूर: वीज गर्जनेसह पाऊस, पुलावरून वाहतेय पाणी तर काय करावे? डीएमएचे उपाय

तसेच एकेरी रस्ता असल्याने कोंडीसुद्धा नेहमीचीच आहे. कॉटन मार्केट, सक्करदार बुधवारी बाजार, छावणी मंगळवारी बाजार, धरमपेठ आणि शताब्दी चौकातील भाजी बाजारासमोरील रस्त्यावरच सडलेला भाजीपाला पडलेला असतो. त्यामुळे अपघाताची संख्या जास्त असते.

जखमींमध्ये सर्वाधिक तरुणी-महिला

रस्ते अपघातात जखमी झालेल्यांमध्ये तरुणी व महिला वाहन चालकांचा सर्वाधिक समावेश आहे. गेल्या सहा महिन्यात वाहनाचे संतुलन बिघडल्याने झालेल्या अपघातात १६५ तरुणी-महिला जखमी झाल्या आहेत. मागच्या वर्षी ही संख्या १३८ होती. वाहन चालवणाऱ्यांमध्ये सर्वाधिक महाविद्यालयीन तरुणींचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

‘ते पाच सेकंद’ पडतात भारी

वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे अनेक सिग्नलवर पोलीस नसतात. हीच संधी साधून वाहनचालक सिग्नल तोडून वाहने सुसाट पळवतात. वाहनचालकांची ही घाई अपघातास कारणीभूत ठरत आहे. हिरवा दिवा होण्यासाठी पाच सेकंद बाकी असताना वाहनचालक वाहने पळवायला सुरुवात करतात. त्यामुळे पिवळा दिवा सुरू असणाऱ्या बाजूने येणारी वाहनेसुद्धा सुसाट निघतात. त्या पाच सेकंदात होणाऱ्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे.

वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे. लाल दिवा असताना वाहन सुसाट न पळवता थांबवावे. पावसाळ्यात रस्त्यावरील चिखल किंवा रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्यास हळू वाहन चालवावे. अतिघाई करून वाहन चालवू नये. जेणेकरून अपघात होणार नाही. – चेतना तिडके (पोलीस उपायुक्त), वाहतूक शाखा.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in the number of road accidents in nagpur adk 83 dvr