नागपूर : राज्यातील औद्योगिक वीज ग्राहकांची संख्या वाढली आहे. येथील औद्योगिक क्षेत्राच्या वीजवापरात गेल्या आर्थिक वर्षांतील मासिक सरासरी ३,८३३ दशलक्ष युनिटवरून वाढ होऊन ती ४,१०१ दशलक्ष युनिट झाली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.
राज्यात २०२१-२२ या आर्थिक वर्षांत उच्चदाब औद्योगिक ग्राहकांनी एकूण ३९,३९७ दशलक्ष युनिट वीज वापरली होती. तर लघुदाब औद्योगिक ग्राहकांनी ६,६०६ दशलक्ष युनिट वीज वापरली होती. एकूण औद्योगिक वीज वापर ४६,००३.२६ दशलक्ष युनिट इतका होता. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षांतील सरासरी मासिक औद्योगिक वीज वापर ३,८३३ दशलक्ष युनिट होता. २०२२ -२३ या चालू आर्थिक वर्षांत राज्यातील औद्योगिक वीज वापरात २६८ दशलत्र युनिटने वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षांत एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात औद्योगिक ग्राहकांना ३२,८०८ दशलक्ष युनिट विजेची विक्री झाली असून हा वीजवापर मासिक सरासरी ४,१०१ दशलक्ष युनिट इतका असल्याचे सिंघल म्हणाले.
औद्योगिक ग्राहक वाढले
राज्यातील नवीन औद्योगिक जोडणी घेणाऱ्या वीज ग्राहकांची संख्या वाढली आहे. २०२१ -२२ या आर्थिक वर्षांत राज्यात एकूण उच्चदाब औद्योगिक वीज ग्राहक १४,८८५ होते. त्यांची संख्या वाढून नोव्हेंबपर्यंत १५,०७८ झाली आहे. लघुदाब औद्योगिक वीज ग्राहकांची संख्याही ३,८१,२७२ वरून वाढून ३,८३,२७२ इतकी झाली आहे. नोव्हेंबरअखेर राज्यात एकूण औद्योगिक वीज ग्राहकांची संख्या ३,९८,३५० इतकी झाल्याचेही महावितरणकडून सांगण्यात आले.
ग्राहकांना सवलती
राज्यात औद्योगिक ग्राहकांना वीजदरात विविध सवलती दिल्या जातात. विद्युत आकारावर १५ टक्के लोड फॅक्टर सवलत, ठोक वीज वापर सूट, लवकर देयक भरण्याची सूट, अतिउच्चदाब ग्राहकांना वहन आकारातील बचत, विजेचा वापर रात्री दहानंतर केल्यास सवलत दिली जाते. सवलतींचा लाभ घेतल्यास उच्चदाब औद्योगिक ग्राहकांना सरासरी ५ रुपये प्रतियुनिट दराने वीज आकारणी होते. सोबत विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या विभागातील तसेच ‘डी’ आणि ‘डी’ प्लस औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना वीजदरात सवलत मिळत असल्याचेही सिंघल म्हणाले.