नागपूर : राज्यात सातत्याने पडणारा पाऊस व तापमान कमी झाल्यामुळे ऐन दिवाळीत २६ ऑक्टोबरला विजेची मागणी १८ हजारांहून कमी म्हणजे १७ हजार ६२३ मेगावॅट होती. परंतु, आता पाऊस थांबल्याने व कृषीपंपाचा वापर वाढल्याने ही मागणी २३ हजार मेगावॅटवर पोहचली आहे. ‘स्टेट लोड डिस्पॅच सेंटर’नुसार, ११ नोव्हेंबर रोजी दुपारी २.१० च्या सुमारास राज्यात विजेची मागणी २३ हजार ३७ मेगावॅट होती. त्यापैकी शासकीय व खासगी वीजनिर्मिती प्रकल्पांत १५ हजार ६१६ मेगावॅटची निर्मिती होत होती.
केंद्राच्या वाट्यातून राज्याला ७ हजार १४३ मेगावॅट वीज मिळत होती तर राज्यात सर्वाधिक ६ हजार ३२ मेगावॅट वीज महानिर्मितीच्या कोळसा, जलविद्युत, गॅस, सौरऊर्जा प्रकल्पातून मिळत होती. त्यात सर्वाधिक ५ हजार २६३ मेगावॅट वीज महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील होती. दरम्यान, खासगी वीजनिर्मिती प्रकल्पातून ८ हजार ४०३ मेगावॅटची निर्मिती होत होती. त्यात अदानी प्रकल्पातील २ हजार ३८४ मेगावॅट, आयडियल १८९ मेगावॅट, जिंदल ४४५ मेगावॅट, रतन इंडिया १ हजार ७२ मेगावॅटसह इतरही प्रकल्पातील वीजनिर्मितीचा समावेश होता. सहसा ऑक्टोबर महिन्यात राज्यात विजेची मागणी चांगलीच वाढते. परंतु यंदा या महिन्यापर्यंत सातत्याने पाऊस पडला. त्यामुळे कृषीपंपाचा वीज वापर खूपच कमी झाला होता. परंतु ऑक्टोबरच्या शेवटी पावसाने उसंती घेतली. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये कृषीपंपांचा वीज वापर वाढू लागला आहे.
हेही वाचा : चित्रा वाघ यांच्या शनिवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांचा बहिष्कार
बऱ्याच भागात थंडी वाढल्याने नागरिकांकडून हिटरचा वापर वाढतोय काही भागात उद्योगांमध्येही विजेची वाढीव मागणी नोंदवली जात आहे. त्यामुळे ही मागणी अचानक १७ दिवसांमध्ये सुमारे ५ हजार मेगावॅटहून जास्त वाढलेली दिसत आहे. दिवाळीचा काळ असलेल्या २६ ऑक्टोबरला राज्यात विजेची मागणी १७ हजार ६२३ मेगावॅट होती. त्यापैकी शासकीय व खासगी वीजनिर्मिती प्रकल्पांत १२ हजार ९२ मेगावॅटची निर्मिती होत होती, हे विशेष. या वृत्ताला महानिर्मिती व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.