कीटकनाशके व खतांच्या किंमती प्रचंड वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
हॉटेल लि-मेरिडीयन येथे आज रविवारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यपीठातर्फेसेंद्रिय शेतीचे महत्त्व या विषयावर आयोजित जागतिक परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थनी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे होते.
भारतामध्ये कीटकनाशक तसेच खतांच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. तसेच कीटकनाशकांच्या असंतुलित वापरामुळे जमिनीचा पोत खराब होत चालला आहे. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, ही काळाची गरज आहे. नागरिकांनी देखील सेंद्रिय भाजीपाला, फळांसाठी आग्रही असावे, असे गडकरी म्हणाले. प्रती एकरी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कृषी संशोधकांनी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाबाबत अवगत करावे. कृषी मालाचा उपयोग इथेनॉल, जैव इंधन निर्मितीसाठी केल्यास शेतकरी समृद्ध होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. डॉ. अनिल बोंडे यांचे यावेळी भाषण झाले. कार्यक्रमाला भारतीय कृषी वैज्ञानिक निवड मंडळ, नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे सहाय्यक महासंचालक डॉ. एस.के.चौधरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यपीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले, माफसूचे कुलगुरू आशीष पातूरकर, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, डॉ. पंजाबराव देशमुख ऑरगॅनिक मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे, परिषदेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. विलास खर्चे, प्राध्यापक (विस्तार शिक्षण विभाग) डॉ. मिलिंद राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.