लोकसत्ता टीम
वर्धा : लोकशाहीत विरोधी पक्षाने जागल्याची भूमिका पार पाडणे अपेक्षित असते. सरकारी धोरणतील जनतेच्या हितास बाधा आणणाऱ्या तरतुदीस हाणून पाडण्याचे कार्य विरोधी पक्षनेते सांसदीय व्यासपीठावर तसेच प्रसंगी रस्त्यावर उतरून करतात. तरच त्याची प्रतिमा खरा विरोधक म्हणून जनतेच्या मनात भरते.पण नेमके याच्या उलट होत असेल तर ? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांच्या भेटीगाठी सध्या चांगल्याच चर्चेत आहेत.
तीन दिवसापूर्वी तर आर्वीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी बसून काळे यांनी केलेले हितगुज संशयाचे सावट गडद करणारे ठरले. त्यातच खा. काळे यांनी एक फाइल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढ्यात धरून त्यावर त्याच क्षणी त्यांची घेतलेली स्वाक्षरी भुवया उंचावणारी ठरली. एव्हढे सख्य ? असा प्रश्न उपस्थितांना पडला. इकडे विरोधकांना कैचीत पकडण्याची एकही संधी सत्ताधारी सोडत नसल्याचे बोलल्या जाते. तर खासदारांचे मात्र चांगलेच मेतकूट.
दर आठवड्यास खासदार केंद्रीय मंत्र्यांसोबत भेटीचे चित्र समाज माध्यमावर टाकून जनतेच्या कामासाठी सजग असल्याचे भासवतात. त्यांचे पक्षनेते शरद पवार यांचे ज्यांच्यासोबत नेहमी वार प्रतिवार सूरू असतात त्या अमित शहा यांना पण खासदार भेटून आले. तसेच शिवराजसिंह चव्हाण, राजनाथ सिंह व अन्य केंद्रीय मंत्र्यांना खासदार काळे निवेदन देऊन आले आहे.
भाजप नेत्यांशी एव्हढी घसट राजकीय वर्तुळत संशयांकित चर्चेला पेव फोडत आहे. त्याला कारणही तसेच. काळे कुटुंबास पक्ष सोडण्याची बाब नवी नाही. निवडणुकीच्या १५ दिवसापूर्वीच अमर काळे ४० वर्षाचा काँग्रेस सहवास सोडून राष्ट्रवादीत दाखल व खासदार होण्याचा ताजाच इतिहास आहे. विधानसभा निवडणुकीत तसेच. आज आर्वीत काँग्रेस पूर्णतः पोरकी करण्याचे श्रेय त्यांच्याच पदरात टाकल्या जाते. आता खासदारांचे लगट म्हटल्या जाणारे भाजप सख्य हे आगामी बदलाची चाहूल तर नव्हे नां, असा प्रश्न चर्चेत आहे.
यावर बोलतांना खासदार काळे भाजपशी मधुर संबंध असल्याचे नाकारतात. लोकांच्या प्रश्नावर भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना भेटणे गैर नाही. काम करून घेणे, ही माझी जबाबदारी आहे. प्रसंगी मी लोकसभेत भाजप व केंद्र सरकारवर टीका केली आहे. मी काँग्रेसी विचाराचाच. जनतेच्या प्रश्नावर वकिली करतो. पुढे आंदोलन करण्याचे काम पडले, तर ते पण करणार . सौख्याचे संबंध सर्वांशीच आहे. त्यात गैर काय, असा सवाल खासदार काळे करतात.