मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत आज सोमवारी झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने राज्यातील शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा उद्या १४ मार्चपासूनचा बेमुदत संप अटळ ठरला आहे. या संपात जिल्ह्यातील तीस हजारांवर कर्मचारी सहभागी होणार असल्याचे जिल्हा समन्वय समितीच्या सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>>‘पैसे दे नाहीतर बायकोला विक’; देसाईगंजमधील सावकाराच्या ऑडियो क्लिपने खळबळ

जुनी पेन्शनच्या मुख्य मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. आज, १३ मार्चला मुख्य सचिवांनी संघटनांना चर्चेसाठी बोलावले. मात्र, त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याने कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासमवेत चर्चेला नकार दिला. यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत चर्चा झाली. यावेळी त्यांनी जुनी पेन्शन बाबतीत समिती वा अभ्यास गट नेमण्याचे आश्वासन दिले. मात्र, पदाधिकाऱ्यांनी जुनी पेन्शनची मागणी मान्य केल्याचे जाहीर करण्याची मागणी रेटली. यामुळे ही चर्चा निष्फळ ठरल्याची व उद्यापासूनचा बेमुदत संप अटळ असल्याची माहिती जिल्हा समन्वय समितीचे निमंत्रक किशोर हटकर यांनी दिली. या संपात शासकीय व निमशासकीय मिळून तीस हजारावर कर्मचारी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>देशातील वीज हानीचे प्रमाण १२ टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य; अवैध जोडण्या, वीज चोरीचा फटका

बैठकीत नियोजन
यापूर्वी बुलढाण्यात पार पडलेल्या जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत संपाचे नियोजन करण्यात आले. या बैठकीला तेजराव सावळे, निमंत्रक किशोर हटकर, नंदकिशोर येसकर, गजानन मोतेकर, अमोल टेम्भे, विलास रिंढे, मंजितसिंह राजपूत, संजय खर्चे, अनिल वाघमारे, भाऊराव बेदरकर, सचिन ठाकरे आदी पदाधिकारी हजर होते. या संपात शासकीय- निमशासकीय कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका, कर्मचारी सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या संपात विदर्भ लघुवेतन कर्मचारी संघ ही सहभागी होणार आहे. राज्याध्यक्ष श्रीकांत जामगडे, महासचिव देविदास बढे, मार्गदर्शक ल.ना. मोरे यांनी येथे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

राजपत्रित वैद्यकीय संघटनेचा पाठिंबा
संपाला महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. राज्य अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड, सरचिटणीस प्रमोद रक्षमवार, कार्याध्यक्ष डॉ. उमाकांत गरड, सचिव डॉ. उज्ज्वला पाटील यांनी पत्रकाद्वारे हा पाठिंबा जाहीर केला.

Story img Loader