कविता नागापुरे, लोकसत्ता
भंडारा : मोबाइलची रिंग वाजताच फोन उचलला जातो. “नमस्कार.. मी भंडारा गोंदिया मतदार संघाचा उमेदवार बोलतोय… माझे चिन्ह आहे …” हा संदेश कानी पडतो. मात्र उमेदवार दम टाकत बोलत सुटतो. उमेदवाराचे उच्चार स्पष्ट नसल्याने क्षणभर काहीच कळत नाही. काही वेळातच हा उमेदवार बोलत असल्याचे लक्षात येते. मार्केटिंग कंपन्यांच्या धर्तीवर थेट मतदारांच्या कानापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून अशा प्रकारे ‘रेकॉर्डेड व्हाइस कॉलिंग’चा वापर केला जात आहे. प्रचाराचा हा नवा फंडा शोधून काढला आहे भंडारा-गोंदिया मतदार संघातील एका उमेदवाराने. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात असलेले अपक्ष उमेदवार सेवक वाघाये निवडणूक प्रचारासाठी हे नवे तंत्रत्रान वापरत आहेत.
हेही वाचा >>> ‘वापरा आणि फेका’ हीच भापजची नीती; महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांची टीका
भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात १८ उमेदवार असून पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. उमेदवार निश्चितीनंतर या क्षेत्रात निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले असून सर्वच उमेदवारांनी प्रचाराच्या तोफा डागल्या आहेत. तळपत्या उन्हातही अगदी डोअर टू डोअर प्रचार सुरू आहे. प्रचाराला वेळ कमी असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते रात्रीचा दिवस करीत आहेत. शिवाय सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप आणि बल्क एसएसएसच्या माध्यमातून उमेदवार प्रचार करीत आहेत. प्रचारासाठी आणि मतदारांना भुरळ घालण्यासाठी उमेदवार नेहमी काहीतरी नवीन मार्ग शोधत असतात. असाच एक मजेदार फंडा अपक्ष उमेदवार माजी आमदार सेवक वाघाये यांनी या निवडणूक प्रचारासाठी सुरू केला आहे. ज्याप्रमाणे नव्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी कंपन्या रेकॉर्डेड व्हाइस कॉलिंगचा उपयोग करतात. मोबाइलधारकांना कॉल करून एकतर्फी पद्धतीने उत्पादनाची माहिती सांगितली जाते. त्याचप्रमाणे प्रचारासाठी सुध्दा कमी वेळ हातात असल्याने रेकॉर्डेड व्हॉइस कॉलची ही कल्पना आता वाघाये यांनी उचलली आहे. त्या माध्यमातून ते थेट मतदारापर्यंत पोहोचू लागले आहेत. मोबाईल वर एक कॉल येतो, ‘मोठे मोठे नेते पक्ष सोडून गेले असताना, पक्ष संकटात असताना, मी पक्षाला सांभाळले आहे, मी आमदार असताना भंडारा जिल्ह्याचे नाव महाराष्ट्र राज्यात गाजवले आहे. जनतेची कामे जिद्दीने व पाठपुरावा करून, करून घेतली आहेत. ऐन वेळी माझी तिकीट स्वार्थापोटी कापली गेली आहे. मी माझ्यावर केलेल्या अन्याया विरुद्ध लढा लढतो आहे. तरी आपण १८ क्रमांकाच्या फ्रिज या चिन्हावर बटन दाबून मला न्याय मिळवून द्यावा व मला विजयी करावे, ही विनंती, अशाप्रकारे सेवक वाघाये व्हॉईसकॉलच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करीत आहेत.
हेही वाचा >>> मोदींच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात विदर्भातून, १० ला रामटेक मतदारसंघात सभा
सेवक वाघाये हे मागील काही दिवसात चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी आदिवासी बहुजन अधिकार सभेसाठी आलेल्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना भेटायला आलेल्या सेवक वाघाये बोलण्यास नकार देत त्यांचा धडधडीत अपमान केला होता तर त्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी मुंबई येथे काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वाघाये यांना बैठकीत बसू न देता त्यांची हकालपट्टी केली होती. त्यानंतर प्रचंड संतापलेले वाघाये यांनी स्वबळावर निवडणुक लढण्याचा निर्धार केला. मात्र अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरतानाच काँग्रेसने संधी दिली तर काँग्रेस च्या तिकीटावर निवडणूक लढणार असेही त्यांनी जाहीर केले. दरम्यान वाघाये यांनी काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँगेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्यावर देखील मीडिया मधून आगपाखड केली. नाना पटोले यांनी पैसे घेऊन डमी उमेदवार दिला असा गंभीर आरोपही त्यांनी केला. मात्र त्यांना कुणीही गांभीर्याने घेतले नाही.. आजही सेवक वाघाये हे कोणत्या पक्षाचे हे कळण्यास मार्ग नाही. याउलट आता ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ असे म्हणण्याची वेळ वाघाये यांच्यावर आली आहे. भंडारा जिल्ह्यात एकेकाळी राजकीय पटलावर सर्वांत चर्चेतील नाव म्हणजे सेवक वाघाये होते. आमदार आणि काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून त्यांची ख्याती होती.
विदर्भातील मोठ्या ओबीसी नेत्यांच्या पंगतीत वाघाये असायचे. कालांतराने नाना पटोले यांना त्यांनी उघडपणे विरोध केला. तेव्हापासून त्यांचा राजकीय वनवास सुरू झाला. नाना पटोले यांनी आपली पकड काँग्रेस पक्षावर मजबूत करताच माजी आमदार सेवक वाघाये यांनी आमदारकीचे तिकीट मिळविण्यासाठी वंचितचा हात धरला. कालांतराने भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान अचानक त्यांनी गळ्यात काँग्रेसचा दुपट्टा घालून काँग्रेसच्या मंचावर त्यांना पाहण्यात आले. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये आल्याचे भंडाराकरांना समजले. मात्र, या दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सेवक वाघाये काँग्रेसमध्ये नसल्याचे वक्तव्य करून नवीन वादाला तोंड फोडले होते. तेव्हापासूनच सेवक वाघाये काँग्रेसमध्ये ‘इन आहे की आउट’ हे अद्याप कळू शकले नाही. विशेष म्हणजे दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांडशी वाघाये यांचे चांगले संबंध असल्याचे वाघाये स्वतः सांगत असले तरी काँग्रेस हायकमांडद्वारेही त्यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाला दुजोरा मिळाला नाही. त्यातच काँग्रेस आपल्याला उमेदवारी देईल या त्यांच्या अपेक्षेवरही पाणी फेरले गेले. आता काँग्रेस पक्षातून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. प्रचाराचे नियोजन करण्यासाठी वेळ नसल्यामुळे आणि प्रचारासाठी हाती कमी वेळ असल्याने वाघाये यांनी ही शक्कल लढविली. थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘रेकॉर्डेड व्हॉइस कॉलिंग’चा वेगळा पर्यायाला त्यांनी पसंती दिली आहे. आता त्यांचा हा नवा फंडा मतदारांना भुरळ घालण्यासाठी कितपत उपयोगी ठरेल हे लवकरच कळेल.