राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील अपक्ष आमदारांचे वजन चांगलेच वाढले आहे. शिवसेना आणि भाजपाकडून अपक्ष आमदारांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू आहे. तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपा या निवडणुकीत ‘घोडेबाजार’ करेल, असा आरोप शिवसेनेकडून वारंवार केला जात आहे. अशातच, चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी ‘घोडेबाजार’ या शब्दावर आक्षेप घेतला आहे. हा शब्दप्रयोग वारंवार करू नये, अन्यथा अपक्ष आमदारांना वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा आमदार जोरगेवार यांनी शिवसेनेला दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यसभा निवडणुकीत राज्यातून भाजपाचे दोन आणि शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा प्रत्येकी एक उमेदवार सहज निवडून येणे शक्य आहे. मात्र, भाजपाने तिसरा आणि शिवसेनेने दुसरा उमेदवार दिल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. यासाठी भाजपा आणि महाविकास आघाडीने अपक्ष आमदारांशी जवळीक साधणे सुरू केले आहे. भाजपा राज्यसभा निवडणुकीत ‘घोडेबाजार’ करेल, म्हणजेच अपक्ष आमदारांना पैशाचे आमिष दाखवून आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करेल, असा आरोप शिवसेना नेते करीत आहे. घोडेबाजार या शब्दाचा वारंवार प्रयोग होत असल्यामुळे आमदार जोरगेवार संतापले आहेत.

“कोणताही राजकीय पक्ष किंवा मोठा नेता मागे नसताना केवळ जनतेच्या आशीर्वादामुळे आम्ही निवडून आलो. घोडेबाजार या शब्दप्रयोगामुळे आमची प्रतिमा मलिन होत आहे. या शब्दाचा प्रयोग थांबवा, अन्यथा अपक्ष आमदारांना वेगळा विचार करावा लागेल,” असा इशारा आमदार जोरगेवार यांनी शिवसेनेला दिला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independent mla kishor jorgewar warns shivsena abn
Show comments