नागपूर : विश्वचषकाचा एकही सामना नागपूरमध्ये आयोजित केला नसल्याने शहरातील क्रीडाप्रेमींमध्ये आधीच निराशा होती. क्रीडाप्रेमींचा रोष कमी करण्यासाठी नागपूरमध्ये १ डिसेंबरला भारत-ऑस्ट्रेलियाचा टी-२० सामना आयोजित करण्यात आला होता. मात्र विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा मैदानावर ‘ड्रेनेज’चे कार्य सुरू असल्याने हा सामनाही आता रायपूरमध्ये स्थानांतरित केला जाणार असल्याची माहिती आहे.
विश्वचषकानंतर लगेचच २३ नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान पाच टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. पहिला टी-२० सामना विशाखापट्टनम येथे होणार आहे. मालिकेच्या अंतर्गत चौथा सामना १ डिसेंबरला नागपूरच्या व्हीसीए मैदानावर होणार होता. मात्र हा सामना आता नागपूरमध्ये न होता रायपूरमध्ये होणार आहे. याबाबत येत्या दोन-तीन दिवसांत अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची शक्यता आहे. व्हीसीएच्या जामठा मैदानावर मागील अनेक महिन्यांपासून ड्रेनेजचे कार्य सुरू आहे. १ डिसेंबरपर्यंत ही कामे पूर्ण होणार नसल्याची चिन्हे नसल्याने व्हीसीए प्रशासनाने बीसीसीआयकडे अर्ज केला. बीसीसीआयने हा अर्ज मान्य केला असून नागपूरचा सामना स्थानांतरित करण्यात येणार आहे.
हेही वाचा – नागपूर : आईचा मृत्यू; विरहात मुलाची आत्महत्या
हेही वाचा – नागपूर : लोकप्रतिनिधींच्या घरांची जाळपोळ, तेली समाजाकडून निषेध, दिला इशारा
रायपूरमध्ये हा सामना घेतला जाण्याची प्रबळ शक्यता आहे. सामना स्थानांतराबाबत व्हीसीए अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे बोलण्यास नकार दिला आहे, मात्र व्हीसीएच्या सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दुसरीकडे आणखी एक क्रिकेट सामना नागपूरमधून हिरावून घेतल्याने शहरातील क्रीडाप्रेमींमध्ये निराशेचे वातावरण आहे.