प्रशांत रॉय
नागपूर : भारत-कॅनडात सध्या राजनैतिक तणाव वाढला आहे. तणावाला कारणीभूत ठरलेले ‘मूळ’ प्रकरण आणि त्याअनुषंगाने त्याला लाभलेले विविध कंगोरे हे थोड्या वेळ बाजूला ठेवून या घटनेचा भारताच्या कृषी क्षेत्रावर, येथील शेतकऱ्यांवर काय व कसा परिणाम होईल, हे समजून घेणे आवश्यक आहे.
कॅनडामध्ये पोटॅश (पालाश) चा मोठा साठा आहे. भारतासह अनेक देशांना कॅनडा पोटॅशची निर्यात करतो. कृषिप्रधान देशांना शेतीसाठी लागणारा पोटॅश अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे. कॅनडा हा भारताला कडधान्य, तेलबिया, कॅनोला तेल, फीड ऑइल आदी वस्तूंचा पुरवठा करतो. भारताला लाल मसूराचा सर्वात जास्त पुरवठा कॅनडा करत आहे. डाळवर्गीय पिके आणि खतांची आयात निर्यात या बाबी देशाची अन्नसुरक्षा व अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरतात.
हेही वाचा >>> वाढीव मालमत्ता कराच्या नोटीस पेटवल्या, करवाढीच्या विरोधात अमरावतीत कॉंग्रेसचा मोर्चा
भारताने २०२२-२३ मध्ये एकूण ८.५८ लाख टन मसूर आयात केला. त्यापैकी ४.८५ लाख टन एकट्या कॅनडातून आयात करण्यात आला. या वर्षीही आतापर्यंत दोन लाख टनांहून अधिक डाळ फक्त कॅनडातून आयात करण्यात आली आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे गहू, डाळीसह तेलाच्या व्यापारावर परिणाम जाणवतो आहे. हवामान बदलामुळेही पीक उत्पादन, उत्पन्न व लागवड क्षेत्रावर मर्यादा येत असल्याची भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे. यामुळे डाळींसह अन्य शेतमालाचे भाव वाढून महागाईला तोंड द्यावे लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर गव्हासह खतांच्या किमती वाढल्या आहेत. शेतीसाठी गरजेचे असलेले नत्र, स्फुरद व पालाश यांचीही मागणी वाढत असून किमतीही वाढत आहे.
देशात विशेषत: डाळी, तेलबियांच्या उत्पादनात घट झालेली आहे. देशांतर्गत डाळींच्या पुरवठ्याची स्थिती अवघड होत आहे. तूर डाळीने जवळपास २०० रूपये किलोचा टप्पा गाठला आहे. हवामान बदल, वाढती महागाई इत्यादी बाब लक्षात घेता शेती उत्पादनासह अन्नसुरक्षेवरही प्रतिकुल परिणाम होण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे मत आहे. या परिस्थितीत रशिया, बेलारूस, इस्त्राईल, चीन आदी देशांकडून पोटॅश खरेदीसाठी भारताचे प्रयत्न असतील.
हेही वाचा >>> “फडणवीस, गडकरींच्या विकासाच्या पोकळ गप्पा अन् भाजपाचा भ्रष्ट कारभार उघड”, असे का म्हणाले नाना पटोले? वाचा…
पोटॅशचा पिकांना असा होतो लाभ पिकांच्या पानामध्ये लहान छिद्र असतात. ही लहान छिद्र प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी उघडबंद होत असतात. ज्याच्या वाटे पिके कार्बन डायऑक्साइड घेऊन ऑक्सिजन तयार करण्याचे काम करत असतात. पिकांना पालाश योग्य प्रमाणात दिल्यास ही लहान लहान छिद्र योग्य प्रकारे उघडबंद होतात आणि प्रकाश संश्लेषण क्रियेचे काम योग्य प्रकारे होते. या पानावाटे तयार झालेले अन्न योग्य त्या ठिकाणी पोहोचवण्याचे कार्यही पालाश करत असते. तसेच झाडाची अन्न तयार करण्यासाठी क्षमता वाढते. पालाश योग्य प्रमाणात पिकास मिळाल्यास फळ आणि बिया उत्तम प्रतीच्या बनत असतात. पालाशमुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते.