लोकसत्‍ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार देशात हुकूमशाही गाजवत आहे. आधी शहरांची नावे बदलली, आता देशाचे नाव बदलायला निघाले आहेत. मोदींच्‍या विरोधात बोलले म्‍हणजे देशाच्‍या विरोधात बोलले असे होत नाही. संविधानात दुरूस्‍ती केल्‍याशिवाय इंडिया हा शब्‍द काढून टाकल्‍या जाऊ शकत नाही. या बदलामुळे जनतेचे कोट्यवधी रुपये खर्च होणार आहेत. त्‍यामुळे अशा फालतू कृतींना विरोध केला पाहिजे, अशी टीका संविधानाचे अभ्‍यासक अॅड. असीम सरोदे यांनी येथे केले.

येथील संत ज्ञानेश्‍वर सांस्‍कृतिक भवनात शनिवारी रात्री आयोजित व्‍याख्‍यानात ते बोलत होते. अध्‍यक्षस्‍थानी माजी विधान परिषद सदस्‍य प्रा. बी. टी. देशमुख हे होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी उपस्थित होते. अॅड. असीम सरोदे म्‍हणाले, काँग्रेसच्या काळात प्रश्न विचारण्याची संधी होती. मात्र आज प्रश्न विचारण्याचा अधिकारच काढून टाकण्यात आला आहे. लोकशाहीत प्रश्न विचारणाचा हक्क आहे, तो आम्ही बजावत राहू.

आणखी वाचा-एका दिवंगत नागपूरकरासाठी १४ देशातील नागरिक सरसावले

भारतीय पंतप्रधान पदावर बसणारा व्यक्ती शिकलेलाच पाहीजे असा नियम नाही. मात्र तुम्ही खोटे प्रमाणपत्र का दाखवता हा आमचा प्रश्न आहे. अॅड सरोदे म्‍हणाले, ‘जी-२०’ चे अध्‍यक्षपद प्रत्‍येक सदस्‍यदेशाला मिळत असते, त्‍यात नवीन काहीही नाही. पण त्‍याची एवढ्या मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करणे म्‍हणजे लोकांच्‍या पैशांची उधळपट्टी आहे. हा पैसा विकासासाठी खर्च झाला पाहिजे. भिडे सारखी वात्रट व्यक्ती अमरावतीत बरगळून जाते. १५ ऑगस्टच्या दिवशी त्यांनी भगवाध्वज घेऊन मिरवणूक काढण्याचा निर्णय सांगलीत घेतला. मनोहर भिडे ही विषवल्ली भाजपा व संघाने वाढवली. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने खतपाणी घातले. बेताल वक्तव्य करणाऱ्या भिडेंवर अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

भाजपाचे समाज माध्‍यमांवरील ‘इंफ्ल्युएन्सर’ विषारी अफवांचा प्रसार करीत आहेत, अशी टीका त्‍यांनी केली. यावेळी विश्‍वंभर चौधरी म्‍हणाले, देशात ज्‍या प्रकारची हुकूमशाही सुरू आहे, ती पाहण्‍यासाठी कुठेही जाण्‍याची गरज नाही. जालन्‍यात झालेला मराठा आंदोलकांवरील लाठीमार हे त्‍याचे जिवंत उदाहरण आहे. २०१४ नंतर सत्‍तेत आलेल्‍या भाजपने देशाच्‍या स्‍वातंत्र्यावर, स्‍वातंत्र्याच्‍या आंदोलनांवर हल्‍ले केले. तंत्रज्ञानाचा दुरूपयोग करून सरदार पटेल आणि नेहरू हे एकमेकांचे शत्रू असल्‍याचे भासवले. नेहरूंना देशाचे शत्रू ठरवले. राष्‍ट्रध्‍वजाचा अपमान, राष्‍ट्रगीताचा अपमान करणारे लोक सत्‍तेवर आहेत, त्‍यांना सत्‍तेवरून पायऊतार केलेच पाहिजे.

आणखी वाचा-शासकीय मेडिकल रुग्णालयामधील अमृत महोत्सव सोहळा पुन्हा वादात!

प्रा. बी. टी. देशमुख म्‍हणाले, लोकशाही व्यवस्थेला ‘हवा’ आवश्यक असते, हवा भरणे-हवा काढणे हे शब्द लोकशाहीत महत्वाचे आहेत. परंतु सध्या देशातली परिस्थिती बघता कुणात हवा भरायची आणि कुणाची हवा काढायची याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. २०१४ पासून भारतीय लोकशाही व संविधानावर होत असलेला भाजप-संघ, मोदी- शाहरुपी हल्ला आता २०२४ मध्ये निर्भयतेने परतावून लावायचा आहे.