नागपूर : हवेची गुणवत्ता आणि प्रदूषण या क्षेत्रात कार्यरत सर्व संबंधित घटकांसाठी ‘इंडिया क्लिन एअर कनेक्ट प्लॅटफॉर्म’ तयार करण्यात आला आहे. हवा गुणवत्ता क्षेत्रात एकत्रितपणे कृती करणे आणि देशातील हवा प्रदूषणावर प्रगत अशी उपाययोजना करणे ही या माध्यमाची उद्दिष्टे आहेत. देशात वर्षभरातील मृत्यूंपैकी जवळपास एक तृतियांश मृत्यूंसाठी हवा प्रदूषण कारणीभूत ठरत असून हा भारतातील सार्वजनिक आरोग्याला असलेला धोका आहे.
जगातील सर्वाधिक ५० प्रदूषित शहरांपैकी जवळपास ७० टक्के शहरे भारतात आहेत. त्याशिवाय देशातील बहुतांश शहरे जागतिक आरोग्य संघटनेच्या हवा गुणवत्ता मानकांची पूर्तता करत नसल्याने देशातील मोठ्या लोकसंख्येला हवा प्रदूषणाच्या प्रतिकूल परिणामांचा धोका आहे. तसेच वातावरण बदल आणि हवा प्रदूषण यांचा अगदी निकटचा आणि परस्पर संबंध आहे.
हेही वाचा – नागपूर: एसटी विभाग नियंत्रकाच्या विरोधात महिला कर्मचाऱ्याची तक्रार, प्रकरण काय पहा…
हवा प्रदूषणावर विविध उपाययोजना अंमलात आणल्या जात असताना हवा प्रदूषणाची समस्या सर्वसमावेशक पद्धतीने हाताळण्यासाठी संबंधित क्षेत्रातील सर्व घटकांनी (धोरणकर्ते, नागरिक, संस्था आणि इतर) एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. मात्र, अशा एकत्रित प्रणाली-स्तरीय कृतीची हवा प्रदूषण क्षेत्रात कमतरता आहे, असे अभ्यासाने सूचित केले आहे.
इंडिया क्लायमेट कोलॅबरेटीव्ह आणि असर सोशल इम्पॅक्ट ॲडव्हायजर्स यांच्या पाठिंब्याने, सेन्सिंग लोकल यांनी हे व्यासपीठ तयार केले आहे. सोळा देशांतील १०० हून अधिक शहरांमध्ये हवा गुणवत्ता क्षेत्रात कार्यरत असणारे ३५० हून घटक, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील माहितीसाठा आणि ज्ञानाचे ७४ स्रोत, या क्षेत्रातील ७० हून अधिक नेटवर्क्स, तसेच देशात कार्यरत संस्था, व्यक्ती आणि संपर्क जाळ्यांना ‘इंडिया क्लिन एअर कनेक्ट’च्या माध्यमातून एकत्रित आणले आहे.
हेही वाचा – वर्धा : हिंदी विद्यापीठात आक्रमक विद्यार्थ्यांमुळे कुलगुरूंचा संरक्षणात विद्यापीठ प्रवेश
‘इंडिया क्लिन एअर कनेक्ट प्लॅटफॉर्म’ हा भारतातील हवेच्या गुणवत्तेच्या माहितीचे समन्वय करेल, जेणेकरून वापरकर्त्यांना हा माहितीसाठा सहजपणे वापरता येईल. महत्त्वाच्या शासकीय सूचना, अधिसूचना, सार्वजनिक स्रोतातून मिळवलेला हवा गुणवत्ता डेटा आणि हवा प्रदूषणाबाबतच्या भूतकाळातील तसेच वर्तमानकालीन अहवालांचे भांडार ही या प्लॅटफॉर्मची वैशिष्ट्ये आहेत.