अमरावती : देशातील कापूस उत्पादन यंदा ८ टक्क्यांनी घटणार असून उत्पादन २९५ लाख गाठींपर्यंत होईल, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) वर्तवला आहे. कापसाचा वापर यंदाही कमी राहणार असला, तरी कापूस आयात जवळपास दुप्पट होऊन २२ लाख गाठींवर पोहोचेल, असे ‘सीएआय’च्या हंगामातील दुसऱ्या अहवालात म्हटले आहे.
ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या कापसाच्या नव्या हंगामात २९५ लाख कापूस उत्पादनाचा अंदाज ‘सीएआय’ने व्यक्त केला आहे. एक कापूस गाठ १७० किलो रुईची असते. मागील हंगामातील शिल्लक साठा जवळपास २९ लाख गाठींचा आहे. यंदा आयात ७६ टक्क्यांनी वाढून २२ लाख टनांची होईल. म्हणजेच यंदा एकूण कापूसपुरवठा ३४६ लाख गाठींचा असेल, असे ‘सीएआय’ने म्हटले आहे. देशातील कापूस वापर गेल्या वर्षी इतकाच म्हणजेच ३११ लाख गाठींचा होईल. कापूस निर्यात १४ लाख गाठींवर स्थिरावेल. मागील हंगामातील कापूस निर्यात १५ लाख ५० हजार गाठींची झाली होती.
हेही वाचा >>> ‘सोलार’ स्फोटाचा संथगतीने तपास; चौकशीबाबत शासकीय यंत्रणांकडून कमालीची गुप्तता
मागील हंगामात देशात १२ लाख ५० हजार गाठी कापूस आयात झाला होता. हीच आयात यंदा २२ लाख गाठींवर पोहोचणार आहे. म्हणजेच आयातीत तब्बल ७६ टक्क्यांची वाढ होणार आहे. यापुढील काळात कापूस उत्पादनाविषयीचे चित्र स्पष्ट होईल. ‘सीएआय’ने आपल्या अंदाजात यंदा १४ लाख गाठी कापूस निर्यात होईल असे म्हटले आहे. मागील हंगामात देशातून १५ लाख ५० हजार गाठी कापूस निर्यात झाली होती.
अधिक उत्पादन कुठे?
मध्य भारतातील गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात १७५.६५ लाख गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. या तीन राज्यांत गेल्या हंगामात १९०.६७ लाख गाठींचे उत्पादन झाले होते. खराब हवामानामुळे या राज्यांत कपाशीच्या पिकावर परिणाम झाला आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये ४०.६६ लाख गाठी, दक्षिण भारतातील तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये ६५.४० लाख गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
राज्यातही तूट
‘सीएआय’च्या अहवालानुसार, महाराष्ट्रात २०२३-२४ या हंगामात ७५.१४ लाख कापूस गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. २०२२-२३ च्या हंगामात महाराष्ट्रात ७९.२५ लाख गाठींचे उत्पादन नोंदवण्यात आले आहे.
‘सीएआय’च्या ‘क्रॉप कमिटी’ने नुकतीच एक बैठक घेतली. यात देशातील विविध कापूस उत्पादक प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे १६ सदस्य उपस्थित होते. संघटनेच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीच्या आधारे कापूस प्रक्रियेचा अंदाज लावण्यात आला आहे. यंदा कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. – अतुल गणात्रा, अध्यक्ष, ‘सीएआय’.