नागपूर : नैऋत्य मोसमी पावसाने राज्यातून माघार घेतली असली तरीही पावसाचे वातावरण कायम आहे. मान्सून परतताच राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे थंडीसाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागेल, हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. यावर्षी “ऑक्टोबर हिट” ने सर्वांनाच त्रस्त केले. अजूनही उकाडा पूर्णपणे गेलेला नाही. सायंकाळपासून पहाटेपर्यंतच थंड वाऱ्याची हलकी झुळूक जाणवते. दिवसा मात्र अजूनही उकाडाच आहे. त्यामुळे सारेच थंडीच्या प्रतीक्षेत आहेत.
अधूनमधून डोकावणारा अवकाळी पाऊस देखील राज्यातून लवकरच विश्रांती घेईल. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात पावसाचा जोर ओसरणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वी तापमानात घट झाली होती, पण आता पुन्हा तापमान वाढताना दिसून येत आहे. रात्रीपासून पहाटेपर्यंत थंडी आणि दिवसा उन्ह अशीच स्थिती राज्यात सर्वत्र आहे. एरवी दिवाळीची चाहूल लागली, म्हणजेच दसऱ्याच्या सुमारास थंडीची जाणीव व्हायची. यावेळी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली तरी म्हणावा तसा थंडीचा पत्ता नाही.
हेही वाचा…गडचिरोली भाजपात असंतोषाची ठिणगी; एक मोठा गट पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत…
u
सध्याच्या अंदाजानुसार ऑक्टोबर अखेर पाऊस थांबून थंडीला सुरुवात होईल. दरम्यान, २६ ते २९ दरम्यान फक्त दक्षिण महाराष्ट्रात चार दिवस किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चार दिवसात अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी तसेच विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर अशा १८ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिल. तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तर कोकणात आज वातावरण कोरडे राहील, तर दक्षिण कोकणात पावसाच्या तुरळक सरी कोसळतील. त्यानंतर पाऊस विश्रांती घेईल.
हेही वाचा…यूजीसीचे विशेष कौशल्याधारित अभ्यासक्रम , काय आहे नाविन्य …
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवारपासून म्हणजेच आजपासून राज्यात पावसाची उघडीप मिळू शकते. त्यामुळे राज्यात एक नोव्हेंबरपासून खऱ्या अर्थाने थंडीला सुरुवात होईल. या आठवड्याच्या अखेरीस नाशिक, जालना, संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला या भागात थंडीला सुरुवात होईल. सध्यातरी नागरिकांना रात्री पडणाऱ्या हलक्या थंडीवर समाधान मानावे लागत आहे. सायंकाळी वाहनांवरून जाताना थंड वाऱ्याची झुळूक जाणवते. तेच घरी आल्यानंतर मात्र उकाडा जाणवतो. एरवी नागपूर शहर देखील लवकर थंड व्हायचे. मात्र, विकासकामांमुळे या शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली. सगळीकडे सिमेंट रस्ते आणि बांधकाम सुरू असल्याने हे शहर देखील आता लवकर थंड होत नाही.