अकोला : अत्याधुनिक वाहनाद्वारे अपघातावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. ‘रोड सेफ्टी व्हिजन’ हे अत्याधुनिक वाहन अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तयार करून घेण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्यसह लोकशिक्षणासाठी हे वाहन फायदेशीर ठरेल. या वाहनात विविध सुविधा असून ‘आरटीओ’च्या सेवा देखील उपलब्ध होतील. या प्रकारचे देशातील हे पहिलेच वाहन असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी दिली.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ‘रोड सेफ्टी व्हिजन’ हे अत्याधुनिक सुविधा असलेले वाहन जिल्ह्याच्या सेवेत रूजू झाले. त्याला हिरवी झेंडी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दाखवली. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, उपवनसंरक्षक कुमार स्वामी, सार्वजनिक बांधकाम अभियंता प्रसाद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन दराडे, अनिरूद्ध देवधर, संदीप तायडे, संदीप तुरकणे, किरण लोणे, मनोज शेळके आदी उपस्थित होते. जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या प्रस्तावानुसार जिल्हा नियोजन समितीने या वाहनासाठी ३३ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. त्यातून हे वाहन निर्माण झाले.
जिल्ह्यात अपघातप्रवण स्थळांची संख्या शून्यावर आणणे आवश्यक आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी विविध उपाययोजना अंमलात आणतानाच प्रभावी लोकशिक्षण दिले पाहिजे. ‘रोड सेफ्टी व्हिजन’ वाहनाच्या माध्यमातून हे कार्य करता येणार आहे. अपघात घडूच नयेत यासाठी शिस्त निर्माण करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
‘सर्व्हेलन्स कॅमेरा’, ‘सर्चलाईट’, लोकशिक्षण
‘रोड सेफ्टी व्हिजन’ वाहनात ‘सर्व्हेलन्स कॅमेरा’, ‘सर्चलाईट’ सुविधा आहेत. या वाहनाने साडेसात टनपर्यंत वजन असलेले वाहन ओढून नेता येते. एखादी व्यक्ती वाहनात अडकली असेल तर त्याला बाहेर काढण्यासाठी लागणारे ‘कटर’सुद्धा या वाहनात आहे. महामार्गावर असलेल्या गावांतून, ग्रामीण भागातूनही बैलगाडी, ट्रॅक्टर, दूधविक्रीसाठी येणारे विक्रेते यांच्याकडून वाहतुकीच्या नियमाचा भंग होतो. अनेकदा चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांचे अपघात होतात. ते टाळता येणे शक्य आहे. त्यासाठी ‘रोड सेफ्टी व्हिजन’ वाहनाचा वापर करून लोकशिक्षण देण्यात येईल. या वाहनाद्वारे वाय-फाय सेवेद्वारे वाहतूक शिकाऊ परवानाही मिळवता येणे शक्य आहे. त्याचप्रमाणे,केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा प्रसारही याद्वारे करण्यात येणार आहे, अशी माहिती रवींद्र भुयार यांनी दिली.