नागपूर : विकास व्हायलाच हवा, पण विकासाच्या नावावर जंगल, वन्यजीवांचा अधिवास ओरबाडला जातोय आणि त्यात भरडला जात आहे तो वन्यप्राणी. रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या, मृत्यू पावणाऱ्या वन्यप्राण्यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र, भारतातील पहिले ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर या वन्यप्राण्यांसाठी जीवदान देणारे केंद्र ठरते आहे. आजवर हजारो वन्यप्राण्यांवर या केंद्रात उपचार झाले आहेत, त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. एवढेच नाही तर त्यांना त्यांचा अधिवास त्यांना परत मिळाला आहे. सावनेर मार्गावर रस्ते अपघातात जखमी झालेल्या कोल्ह्याला जीवदान देण्यात ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राला यश आले. पायाचे हाड मोडलेल्या कोल्ह्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
वनखात्याच्या सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या चमूने १२ ऑगस्ट २०२३ ला अपघातात गंभीर जखमी झालेल्या कोल्ह्याला उपचारासाठी केंद्रात आणले. या कोल्ह्याच्या मागील डाव्या पायाचे हाड मोडले होते आणि स्नायुंमधून मोडलेले हाड बाहेर आले होते. त्याची क्ष-किरण तपासणी केली असता ही गंभीर बाब समोर आली. नागपूर प्रादेशिक विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्या मार्गदर्शनात गेल्या तीन वर्षात ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राने बरीच प्रगती केली आहे. वन्यप्राण्यांच्या उपचाराची अत्याधुनिक साधणे येथे असून हे केंद्र देखील अत्याधुनिक झाले आहे. याच केंद्रात पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक डॉ. राजेश फुलसुंगे, डॉ. सुदर्शन काकडे यांनी कोल्ह्याला ‘फ्लुईड थेरपी’ तसेच सहाय्यक उपचार देल्यानंतर कोल्ह्याची प्रकृती स्थिर झाली. यानंतर हाडांची ‘इंट्रामेड्युलरी पिनिंग’ करुन त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया फार सोपी नव्हती आणि शस्त्रक्रियेनंतर काळजी घेणे आवश्यक होते.
हेही वाचा…“मुख्यमंत्री महोदय, दहशतीत काम करतोय, लक्ष द्या,” कुणी घातले साकडे, ते वाचा…
मात्र, डॉ. राजेश फुलसुंगे, डॉ. सुदर्शन काकडे, डॉ. पंकज थोरात, सिद्धांत मोरे यांनी यशस्वी शस्त्रक्रियेसोबतच त्याची काळजी देखील घेतली. तसेच शस्त्रक्रियेनंतर राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते यांच्या मार्गदर्शनात शुभम मंगर, महेश मोरे, प्रयाग गणराज, चेतन बारस्कार, बंडू मगर यांनी तो कोल्हा पूर्णपणे बरा व्हावा आणि नैसर्गिक अधिवासात त्याची मुक्तता करता यावी म्हणून अथक परिश्रम घेतले. तब्बल दहा महिन्यांच्या उपचार प्रक्रियेनंतर कोल्ह्याला नुकतेच पवनी वनपरिक्षेत्रातील बावनथडी वनक्षेत्रात मुक्त करण्यात आले.