नागपूर : वन्यप्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या चिमुकल्या पिल्लांसाठी भारतातील पहिले स्वतंत्र उपचार केंद्र नागपुरात सुरू झाले आहे. या केंद्रात त्यांच्यावर उपचार तर केलेच जातात सोबतच मायेची ऊब देखील दिली जाते. वन्यप्राण्यांवर उपचार, उपचारानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करणारे भारतातील पहिले ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्र सुमारे नऊ वर्षांपूर्वी नागपुरात सुरू झाले. राज्याच्या वनविभागाने हे केंद्र सुरू केल्यानंतर अनेक राज्याच्या वनखात्यांनी या केंद्राची पाहणी केली आणि त्यांच्याही राज्यात याच पद्धतीचे ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्र सुरू केले.
नागपुरातील या केंद्राचा अलीकडेच पुनर्विकास करण्यात आला. या केंद्रात वन्यप्राणी तसेच पक्ष्यांच्या पिल्लांसाठी स्वतंत्र ‘पेडियाट्रिक वॉर्ड’ सुरू करण्यात आला. याआधीही या केंद्रात पिल्लांवर उपचार होत होते, पण आता त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला. याठिकाणी उपचारासोबतच मायेची ऊब देखील दिली जाते. त्यामुळे अतिशय कमी कालावधीत वन्यप्राणी आजारातून मुक्त होत आहेत. मानव-वन्यप्राणी संघर्ष, वन्यप्राण्यांमधील आपसी लढा, तसेच जंगलातील विविध घटनांमध्ये जखमी झालेली, कुटुंबापासून वेगळी झालेली वन्यप्राण्यांची पिल्ले यांना या विशेष वॉर्डात ठेवले जाते. या वॉर्डात सध्या अस्वल, बिबट, कोल्हा, माकड, हरीण, विविध प्रकारचे पक्षी, कासव, साप यांची पिल्ले उपचार घेत आहेत.
हेही वाचा…शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याकरीता १५ मेपर्यंत अंतिम मुदतवाढ
२४ तास सेवा
पेडियाट्रिक वॉर्डमध्ये सी-आर्म युनिट, डिजिटल एक्स-रे युनिट, अल्ट्रासाऊंड मशीन, मल्टी-पॅरामॉनीटर, गॅसियस ॲनेस्थेसिया वर्क-स्टेशन, हेमो-ॲनालायझर, बायो-केमिकल ॲनालायझर, फिजिओथेरेपी उपकरणे, इनक्यूबेटर, इन्फ्रारेड लाइट थेरपी आदी सुविधा आहेत. विशेष म्हणजे, अनुभवी पशुवैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची चमू येथे २४ तास तैनात असते.
हा भारतातील पहिलाच प्रयोग वनखात्याने केला आहे. ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या पुनर्विकासासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा खर्च झाला असून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी देखील जिल्हा नियोजन समितीतून बराचसा निधी तर काही निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला. त्यामुळेच आम्ही हा एक महत्त्वाचा टप्पा ओलांडू शकलो. – डॉ. भारत सिंह हाडा, उपवनसंरक्षक (प्रादेशिक)
हेही वाचा…प्रचार सभेत भोवळ, विश्रांतीचा सल्ला, तरीही….
नैसर्गिक वातावरणात विविध सुविधांनी सज्ज असा हा वॉर्ड आहे. वन्यप्राणी आणि पक्ष्यांच्या पिल्लांना खेळण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देणाऱ्या पिंजऱ्याची रचना करण्यात आली आहे. केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यांच्यावर मायेची पखरण करत उपचार केले जातात. त्यामुळे नागरिकांनी कुठेही जखमी, आजारी वन्यप्राणी, पक्षी किंवा त्यांची पिल्ले आढळून आली तर त्यांनी ती ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात आणून द्यावीत. – कुंदन हाते, माजी सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ