लोकसत्ता प्रतिनिधी
नागपूर : विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर तब्बल सहा वर्षानंतर एकदिवसीय सामन्याचे आयोजन केले जाणार आहे. येत्या ६ फेब्रुवारी रोजी हा बहुप्रतिक्षित सामना भारत विरुद्ध इंग्लंड संघादरम्यान होणार आहे. तीन सामन्याच्या या शृंखलेतील पहिलाच सामना नागपूरमध्ये होणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये चांगलाच उत्साह आहे. इंग्लंड संघाविरोधातील इतर दोन सामने ९ फेब्रुवारीला कटकमध्ये तर १२ फेब्रुवारीला अहमदाबाद येथे होणार आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी व्हीसीएद्वारा तिकिटविक्रीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
असे काढा तिकिट…
भारत विरुद्ध इंग्लंड सामना ६ फेब्रुवारी दुपारी दीड वाजल्यापासून व्हीसीएच्या जामठा मैदानावर खेळविला जाईल. या मैदानाची क्षंमता सुमारे ४४ हजार लोकांची आहे. या मैदानावर अंतिम सामना २०१९ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरोधात खेळविण्यात आला होता. जामठाच्या मैदानावरील हा आतापर्यंतचा नववा एकदिवसीय सामना असेल तर नागपूरमधला एकूण २३ वा एकदिवसीय सामना राहील. ६ फेब्रुवारी होणाऱ्या सामन्यासाठी तीन फेब्रुवारीला दोन्ही संघ नागपूरमध्ये येतील. ४ आणि ५ फेब्रुवारीला दोन्ही संघ सराव करतील. नागपूरमधील सामन्यासाठी तिकिटविक्री ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ही तिकिटविक्री जोमॅटोच्या डिस्ट्रिक्ट ॲपच्या माध्यमातून केली जाईल. सामान्य लोकांसाठी तिकिटविक्री सुरू होण्यापूर्वी व्हीसीए सदस्यांना तिकिटविक्री केली जाईल. २९ ते ३१ जानेवारी दरम्यान सिव्हिल लाईन्स येथील व्हीसीए मैदानावर केवळ सदस्यांसाठी तिकिट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
व्हीसीएचे सदस्य तसेच संलग्नित क्लबच्या सदस्यांना प्रत्येकी एक तिकिट मोफत दिले जाईल. प्रत्येक सदस्याला चार तिकिटे विकत घेण्याची संधी देखील उपलब्ध राहणार आहे. सदस्यांना तिकिटविक्री झाल्यावर २ फेब्रुवारीपासून सामान्य लोकांना तिकिट विकली जातील. सकाळी १० वाजतापासून डिस्ट्रिक्ट ॲपच्या माध्यमातून लोकांना तिकिटे घेता येतील. प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त दोन तिकिट घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. ऑनलाईन तिकिट घेतल्यावर लोकांना ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान प्रत्यक्ष तिकिट घ्यावे लागेल. व्हीसीएच्या सिव्हिल लाईन्स येथील मैदानावर ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान सकाळी ९.३० ते रात्री ८.३० दरम्यान चाहत्यांना तिकिट घ्यावे लागेल. ६ फेब्रुवारी रोजी सामन्याच्या दिवशी सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत ही सुविधा उपलब्ध राहील. यंदाही शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच अनाथ मुलांसाठी व्हीसीएमार्फत तिकिट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.