वाशिम : भारत देश म्हणजे हिंदू राष्ट्र आहे. जगाला धर्म देण्याचे काम भारताला करायचे आहे. सर्व जगातल्या लोकांना कसे जगावे, हे शिकविण्याची आपली जबाबदारी आहे. जगाला धर्म देण्यासाठी भारताला जगायचे आहे. आपापल्या संप्रदायाचे काम प्रत्येकाने सातत्याने केले पाहिजे, त्यासाठी समाजाचा व्यूह तयार व्हायला पाहिजे. लोकहितातून देशहीत साधायचे आहे. अशाने भारत देश विश्वगुरूपदी आरूढ झालेला लवकरच आपणास पाहायला मिळेल, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
येथील वासुदेव आश्रमात दुर्मिळ चातुर्मास्य श्रौत याग श्रीकूष्मांड नवमी महोत्सवाच्या अनुषंगाने होत आहे. त्यानिमित्त सरसंघचालक भागवत येथे आले होते. ते पुढे म्हणाले, १८५७ पासून भारताच्या उत्थानास प्रारंभ झाला. नियती भारताला विश्वगुरूपदी आरूढ करणारच आहे. आमच्या पूर्वजांनी धर्माला अनुसरून कर्म दिले आहेत. संघात शाखा सर्व काही आहे पण कुठेही अतिवादिता नको. मनुष्याला आपल्या सेवेची योग्यता टिकवावी लागते.
हेही वाचा… फडणवीस, मुनगंटीवार यांना ठार मारण्याची धमकी; कट्टर विदर्भवादी बाबाराव मस्की यांच्यावर गुन्हा दाखल
हेही वाचा… बुलढाणा : मनोज जरांगे पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
ज्यांना कसलाच मोह राहिला नाही, ते म्हणजे मोहन भागवत, असे मत बंगळुरू येथील श्रुंगेरी महासंस्थानचे मठाधिपती विद्याविश्वेश्वर भारती शंकराचार्य महास्वामी महाराजांनी व्यक्त केले. सूर्य मावळताना आपले तेज शमी वृक्षात ठेवतो, त्याचप्रमाणे प.पू. पंडितकाका धनागरे महाराजांनी त्यांचे तेज प.पू. विजयकाका पोफळी महाराज यांच्यात प्रतिष्ठापित केले, असेही महास्वामी म्हणाले. करवीर संकेश्वर पीठाचे दगदगुरू शंकराचार्य सच्चितानंद अभिनव विद्या नृसिंह भारती महास्वामी महाराज यांनी ५० चातुर्मास्य याग केले आहेत, अशी माहितीसुद्धा श्रुंगेरीच्या शंकराचार्यांनी यावेळी दिली.