भारतासोबत माझे फार जुने संबंध आहेत. भारत चांगले काम करत असून भविष्यात हा देश विज्ञानाची महासत्ता बनेल, असा विश्वास नोबेल विजेत्या प्रा. ॲडा योनाथ यांनी व्यक्त केला. १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी योनाथ नागपुरात आल्या असता त्यांनी जनसंवाद विभागात आयोजित एका कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा- नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपाचा गाणारांना पाठिंबा? चंद्रशेखर बावनकुळे यांचे संकेत
भारतात मी अनेकदा आली. दिल्ली येथे संशोधन परिषदांनाही आली आहे. नागपुरात येण्याची संधी पहिल्यांदा मिळाल्याचे सांगून याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. नोबेल पुरस्कारासाठी नाव जाहीर झाल्यावर कसे वाटले, असे विचारले असता, त्या म्हणाल्या, कुणीतरी आपली थट्टा करत आहे, असे वाटले. विज्ञानाकडून लोकांना फार अपेक्षा आहेत. यात फार आवड असल्याशिवाय संशोधन करू शकत नाही. आपले संशोधन जसे जसे कठीण होत जाईल तसेच आपले यश वाढत जाईल. १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसची संकल्पना ही फार सुंदर असून मला खूप आनंद होत असल्याचे प्रा. ॲडा योनाथ म्हणाल्या.