लोकसत्ता टीम
भंडारा : २० दिवसांपूर्वी लग्न झालेला भारतीय सेनेचा जवान सुट्ट्या संपल्यानंतर कर्तव्यावर रुजू होण्यासाठी निघाला. रेल्वे प्रवासात असताना रात्री नववधूसोबत गप्पा झाल्या आणि तो झोपी गेला. मात्र त्या क्षणानंतर तो अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. पाच दिवस लोटूनही त्याचा थांगपत्ता न लागल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
भंडारा येथील गुड्डू मुकेश सिंग गौड (२४) हा भारतीय सेनेत आहे. सध्या तो लेह लद्दाख येथे कार्यरत आहे. लग्न असल्याने तो सुट्ट्यावर आला होता. ११ डिसेंबर २०२४ ला दिल्ली येथे त्याचे थाटात लग्न झाले. लग्नानंतर तो पत्नीसह भंडारा येथे कुटुंबासह वास्तव्यास होता. सुट्ट्या संपल्याने तो ३१ डिसेंबरला गोंडवाना एक्सप्रेस रेल्वेने दिल्ली करिता रवाना झाला. परतीच्या प्रवास दरम्यान तो रात्री पत्नीसह भ्रमणध्वनीवर बोलत होता. आराम करायचे सांगून त्याने फोन ठेवला व दुसऱ्या दिवशी दिल्लीला जाताच घरी फोन करण्याचे सांगितले. पण दुसऱ्या दिवशी तो निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर पोहचला नाही. संपूर्ण प्रवाशी खाली उतरून आपल्या पुढच्या प्रवासाला गेले. पण गुड्डू चे सामान जसच्यातस रेल्वे डब्यात असल्याचे सफाई कामगाराला निदर्शनास आले. शोध घेऊनही सदर प्रवासी न गवसल्याने त्याने बॅगवर असलेल्या भ्रमणध्वनी नंबरवर फोन केला. तेव्हा सदर युवक गायब असल्याचे निदर्शनास आले.
पालकांना माहिती मिळताच त्यांनी निजामुद्दीन येथील नातेवाईकांना रेल्वेस्थानकावर पाठवून शोधण्यात आले. शोध न लागल्याने वरठी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या घटनेला जवळपास ५ दिवस झाले असून अजूनही त्या युवकाचा शोध न लागल्याने आई वडिलांची चिंता वाढली आहे. यंत्रणा लागली कामाला प्रवास दरम्यान अचानक भारतीय सेनेचा जवान गायब झाल्याने संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. घटनेचा तपास वरठी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश गिरी करीत आहेत.
सहप्रवासी व इतर सर्व पैलूंवर पोलिसांचा तपास सुरू असून भारतीय सेनेचे सर्व अधिकारी व त्यांची टीम यासह रेल्वे पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत. त्या भांडणाचा तपास लग्नाच्या धार्मिक विधी करिता सर्व कुटुंब मोहाडी तालुक्यातील खोडगाव येथे गेले होते. विधी सुरू असताना परिसरातील काही युवकाशी शाब्दिक चकमक झाली होती. सदर युवक गुंड प्रवृत्तीचे असल्याने पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निलेश गिरी यांनी दिली.
नववधूसह पालकांची भटकंती
२० दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नववधू यासह त्याच्या पालकांची चिंता वाढली आहे. ५ दिवस लोटूनही थांगपत्ता न लागल्याने त्याची भटकंती होत आहे. मुलाचा शोध घेण्यासाठी परिवारातील सदस्य बाहेर पडल्याने घरात पसरली असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली. मुलगा शोधण्यासाठी वडिलांची जीवघेणी धावपळ सुरू आहे.