भारतीय संविधानाच्या सुरक्षेला धोका असल्याची भीती लीलाताई चितळे यांनी व्यक्त केली. मात्र, या भीतीचा संदर्भ हा केवळ राजकारणाशी आहे. त्यांनीच भारतीय संविधानाविषयी असुरक्षिततेच्या भावनेला बळ दिले, यात कुठलीही शंका नाही. मात्र, या देशाचा माजी सरन्यायाधीश म्हणून आपल्याला विश्वास देतो की भारतीय संविधान पूर्णपणे सुरक्षित आहे, असे प्रतिपादन माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केले.
‘नागभूषण अवार्ड फाऊंडेशन’च्या वतीने दरवर्षी विदर्भाचा लौकिक वाढवणाऱ्या मान्यवरांना एक लाख रुपये, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला जातो. शुक्रवारी ( १८ नोव्हेंबर ) झालेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये २०१९ चा पुरस्कार नामवंत विधिज्ञ वकील हरीश साळवे यांना, २०२० चा पुरस्कार स्वातंत्र्य सेनानी लीलाताई चितळे यांना, तर २०२१ चा पुरस्कार माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले.
यावेळी बोलताना लीलाताई चितळे यांनी म्हटलं की, “भारतीय संविधानाच्या सुरक्षेला धोका असल्याची भीती व्यक्त केली. ज्या संविधानाने आम्हाला समता, बंधुता दिली. त्याला धोका असेल तर व्यासपीठावरील विधिक्षेत्रातील मान्यवरांनी त्याच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारावी,” अशी विनंती चितळे यांनी केली.
यावर माजी सरन्यायाधीश बोबडे म्हणाले की, “भारतीय संविधान पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले. पण, केवळ राजकीय लोक तशी भीती दाखवतात. जनतेने भीती बाळगू नये.” माजी न्यायमूर्ती सिरपूरकर यांनीही “सर्वोच्च न्यायालय संविधानाला कुठलाही धक्का लागू देणार नाही,” असा विश्वास व्यक्त केला. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेलं संविधान चांगले आहे. मात्र, त्याला अंमलात आणणारे कसे आहेत, यावर त्याचे महत्त्व अवलंबून आहे. त्यामुळे संविधानाला धोका नाही,” असेही माजी न्यायमूर्ती सिरपूरकर यांनी सांगितले.
दरम्यान, माजी सरन्यायाधीश बोबडे यांनी सत्काराला उत्तर देताना संस्थेचे आभार मानत विदर्भच्या परंपरेचे कौतुक केले. माजी खासदार अजय संचेती यांनी अध्यक्षीय भाषण केले. तर, नागभूषण अवार्ड फाऊंडेशनचे सचिव निशांत गांधी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. यावेळी विलास काळे, सतीश गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.