लोकसत्ता टीम

नागपूर : विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा स्टेडियमवर आज भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला एकदिवसीय सामना सुरू आहे. सहा वर्षांनंतर शहरात वनडे सामना होत असल्याने, प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. नागपूरकरांच्या उत्साहाला उधाण आले आहे.

क्रिकेट फिव्हर : स्टेडियमच्या बाहेर प्रचंड गर्दी

सकाळपासूनच नागपूरच्या विविध भागांतून क्रिकेटप्रेमी स्टेडियमकडे रवाना होताना दिसत आहेत. भारतीय संघाचा जल्लोष साजरा करण्यासाठी, चाहते तिरंगा आणि टीम इंडियाचे टी-शर्ट घालून मैदानाकडे जात आहेत. विशेषतः, विराट कोहली आणि रोहित शर्माच्या टी-शर्टना सर्वाधिक मागणी आहे. शहरातील विविध ठिकाणी हे टी-शर्ट विक्रीसाठी ठेवण्यात आले असून, अनेक ठिकाणी स्टॉक संपल्याचे पाहायला मिळत आहे.

रस्त्यांवर जल्लोष : निळ्या रंगाने नटलेले नागपूर

शहरातून मैदाकडे जाणारा मार्ग आणि जामठा स्टेडियमच्या परिसरात भारतीय संघाच्या जर्सी घातलेले चाहते सेल्फी घेताना, झेंडे फडकवत गाणी गाताना दिसत आहेत. स्टेडियमच्या बाहेर ढोल-ताशांच्या गजरात भारतीय संघाच्या समर्थकांनी आनंदोत्सव सुरू केला आहे.

वाहतुकीवर परिणाम : पोलीस सतर्क

क्रिकेटप्रेमींच्या प्रचंड गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतूक संथ झाली आहे. जामठा स्टेडियमच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून, नागपूर पोलिसांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन केले आहे. ड्रोनच्या मदतीने वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

‘टीम इंडियाच जिंकेल!’ चाहत्यांचा विश्वास

“भारत इंग्लंडला सहज पराभूत करेल. रोहित-कोहली तुफान फटकेबाजी करतील,” असा विश्वास जतवत अमरावतीहून आलेले एक क्रिकेटप्रेमी आनंद व्यक्त करत होते. काही चाहत्यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘चक दे इंडिया’च्या घोषणा देत जल्लोष साजरा केला. नागपूरच्या क्रिकेटप्रेमींमध्ये सध्या सामन्याचा थरार अनुभवण्यासाठी जबरदस्त उत्साह आहे. आता सर्वांचे लक्ष भारताच्या दमदार कामगिरीकडे लागले आहे!

Story img Loader