भंडारा : भंडारा वन विभागाच्या रावनवाडी परिसरात ‘इंडियन ग्रे वुल्फ’ म्हणजेच भारतीय लांडगा आढळला.वाईल्ड वॉच फाउंडेशनचे सदस्य आणि प्रसिद्ध वाइल्डलाईफ फोटोग्राफर विवेक हुरा यांना रावनवाडी येथील एका शेताजवळ लांडगा दिसला.. या घटनेमुळे भंडारा परिसरात लांडग्यांची संभाव्य उपस्थिती याबाबत चर्चा सुरू झाली आहे.तब्बल १४ वर्षांनंतर या भागात भारतीय लांडगा आढळला असून, भंडारा वन क्षेत्रात त्याच्या अस्तित्वाची शक्यता असल्याचे संकेत मिळाले आहेत. याआधी २०१२ मध्ये एफडीसीएमच्या सोनेगाव वन क्षेत्रात वाईल्ड वॉच फाउंडेशनचेच सदस्य नरेंद्र गुर्जर, शैलेन्द्र राजपूत, नदीम खान आणि सर्वेश दीपक चड्डा यांनी दोन लांडगे पाहिले होते.
भारतीय लांडगा ‘गंभीर संकटग्रस्त’ या श्रेणीत असून तो मुख्यत्वे मध्य भारतातील काही ठिकाणीच आढळतो. या प्रजातीची संख्या कमी होत चालली आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील अर्ध-सदाहरित जंगलांमध्येही या लांडग्यांचे अस्तित्व असल्याचे रामसर साइटच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
विवेक हुरा यांच्या मते, लांडग्यांची संख्या, वितरण आणि त्यांच्या पर्यावरणीय भूमिकेबाबत अधिक सखोल अभ्यासाची गरज आहे. भंडारा वन क्षेत्रात लांडग्यांची उपस्थिती ही त्यांच्या अधिवासाच्या विस्ताराचे द्योतक असू शकते, पण यासाठी अधिक सखोल अभ्यास आवश्यक आहे. त्यांनी सांगितले की, वाईल्ड वॉच फाउंडेशनमार्फत हा रेकॉर्ड आणि जीपीएस लोकेशन डब्ल्यूडब्ल्यूएफ व वन्यजीव संस्था, देहरादून यांच्याशी शेअर केला जाईल.
उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी सांगितले की, या नव्या माहितीच्या अनुषंगाने वन विभागाने परिसरात निगराणी वाढवण्याची आणि सविस्तर सर्वेक्षण करण्याची योजना आखली आहे, जेणेकरून या संकटग्रस्त प्रजातीचे संरक्षण सुनिश्चित करता येईल.