नागपूर : ऑल इंडिया जेम ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलतर्फे (जीजेसी) देशातील ३०० शहरांमध्ये ३ हजार किरकोळ सराफा व्यावसायिकांना बरोबर घेत भारतीय दागिने विक्री महोत्सव (आयजेएसएफ) सुरू करण्यात आला आहे. त्यात १.२० लाख कोटींच्या व्यवसायाचा अंदाज ‘जीजेसी’तर्फे व्यक्त केला गेला.
नागपुरातील हाॅटेल तुली इंपेरियल येथील कार्यक्रमात उपराजधानीतील महोत्सवाला अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते प्रारंभ झाला. याप्रसंगी जीजेसीचे उपाध्यक्ष राजेश रोकडे, संयुक्त संयोजक मनोज झा, माजी अध्यक्ष नितीन खंडेलवाल उपस्थित होते. मनोज झा म्हणाले, २२ नोव्हेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार असून त्यात नोंदणी केलेल्या सराफा व्यावसायिकांकडे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी सूट व बक्षीस मिळेल. महोत्सवात विजेत्यांना ३५ कोटींचे दागिने दिले जाईल. महोत्सवात सहभागी सराफा व्यावसायिकांकडे २५ हजार रुपयांपर्यंत दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांना खात्रीशीर डिजिटल कुपन, सोबत मर्यादित आवृत्तीचे चांदीचे नाणे दिले जाईल. तर प्रत्येक ५ हजार कुपनच्या प्रत्येक सेटवर २५ ग्रॅम सोन्याचे नाणे यांसारखी इतर चमकदार बक्षिसे दिली जाईल. या महोत्सवातून ३ हजार सराफा व्यावसायिकांकडे सुमारे १ लाख २० हजार कोटींचा व्यवसाय होण्याची आशा आहे. नितीन खंडेलवाल म्हणाले, या महोत्सवात ४ कोटी अनिवासी भारतीयांनाही भारतात दागिने खरेदी करण्याची परवानगी दिली जाईल. त्यातून येथील सराफा व्यवसाय सुमारे ३० ते ३५ टक्यांनी वाढण्याची आशा आहे.
हेही वाचा – उत्तरेकडील राज्यात थंडीची चाहूल, महाराष्ट्रात मात्र उन्हाचे चटके
राजेश रोकडे म्हणाले, या महोत्सवात देशभरातील ग्राहकांना ४० किलो सोने जिंकण्याची संधी आहे. बहुतांश व्यवहार डिजिटल पद्धतीने होणार आहे. परंतु, जर एखाद्या महोत्सवात जुळलेल्या सराफा व्यावसायिकाकडे कुणी ग्राहकाने रोखीत २५ हजार रुपयांची खरेदी केली. तर त्याला उपलब्ध होणारे कुपन मात्र ‘डिजिटल’ दिले जाईल.
हेही वाचा – निसर्गदत्त नियमांचे पालन करतो तो हिंदू – शरद पोक्षे
सोने-चांदी, हिऱ्यांना जगभरात मान्यता
जगातील काही देशांत डाॅलर, काही देशांत रुपया व इतरही चलन चालते. युद्धग्रस्त युक्रेन अथवा पॅलिस्टीनमध्ये जमीन व इतर संपत्तीला किंमत नाही. परंतु, सोने-चांदी आणि हिरे या दागिन्यांना जगभरात किंमत आहे. त्यामुळे या गोष्टींमध्ये गुंतवणुकीत भारतीयांना विश्वास असल्याचे राजेश रोकडे म्हणाले.