नागपूर : राज्यात उन्हाळ्याची सुरुवात लवकर म्हणजेच फेब्रुवारीच्या उत्तरार्धापासून झाली. याच महिन्यात राज्यातील तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेले. मार्च महिन्यात ही उष्णतेची लाट विदर्भाकडे सरकली आणि विदर्भात तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले. गेल्या आठवडाभरापासून विदर्भात उन्हाच्या चटक्याने नागरिक हैराण झाले आहेत. ही उष्णतेची लाट आता हळूहळू कमी होत असली तरी उकाड्याने नागरिक प्रचंड हैराण आहेत. दरम्यान, आता भारतीय हवामान खात्याने येत्या दोन दिवसात विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. होळीपूर्वीच नागपूर शहर आणि विदर्भातील पाऱ्याने चाळीशी ओलांडल्याने यंदाचा उन्हाळा तापदायक ठरणार याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, या आठवड्यात विदर्भात तीन दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या वातावरणात मोठे बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्य भारतातील वाऱ्यांच्या एकत्रित प्रभावामुळे सध्या ईशान्य भारताकडून खाली मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे . याचा प्रभाव विदर्भासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांवर होण्याचीही शक्यता आहे . सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती तसेच पश्चिमी चक्रावताचा प्रभाव छत्तीसगड ते विदर्भाच्या भागात सक्रिय आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी येत्या पाच दिवसात हलका पाऊस होणारा असून विदर्भातील काही जिल्ह्यांना येत्या दोन दिवसात म्हणजेच २० ते २२ मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
यावेळी ४० ते ५० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. २१ मार्चला वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. २२ मार्चला वाशिम , नागपूर , भंडारा , चंद्रपूर , गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. १९ व २० मार्चला छत्रपती संभाजी नगर जालना परभणी हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर २१ मार्चला परभणी हिंगोली व नांदेड जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे .