नागपूर : गणरायाच्या आगमनापूर्वी राज्यात पाऊस चांगलाच सक्रिय झाला होता. त्यानंतर आता पाऊस परतीची वाट धरेल असे वाटत असताना येत्या तीन दिवसात राज्यात पावसाची ये-जा राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. अनंत चतुर्दशीला पाऊस विश्रांती घेणार असला तरीही आज आणि उद्या मात्र, पावसाच्या आगमनाचे संकेत आहेत.
हवामान खात्याचा इशारा काय ?
पाऊस परतणार असे वाटत असतानाच पुन्हा एकदा पाऊस जोर धरणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. पश्चिम बंगाल आणि बांगलादेश याठिकाणी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पावसाने पुन्हा जोर धरल्याचे भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. कोकणात रत्नागिरी, रायगड या दोन जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. सोमवार, १६ सप्टेंबरला विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर अनंत चतुर्दशीला मात्र पाऊस विश्रांती घेणार असल्याने गणरायाला पावसाच्या अडथळ्याविना निरोप देता येणार आहे.
हे ही वाचा…वर्धा : अफलातून असहकार ! शासनाच्या ‘ वॉट्स अँप ग्रुप’मधून बाहेर पडणार
आतापर्यंतची पावसाची स्थिती काय ?
एक जून ते ११ सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात १०६८.६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर महाराष्ट्रातील ३६ पैकी २६ जिल्ह्यांमध्ये दीर्घ कालावधीच्या सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याचे भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीत म्हटले आहे. २६ जिल्ह्यांपैकी छत्रपती संभाजीनगर आणि सांगली या दोन जिल्ह्यात अनुक्रमे ६६ आणि ६४ टक्के इतका अधिकचा पाऊस झाला आहे. सामान्य सरासरी पावसापेक्षा अधिक पाऊस या दोन जिल्ह्यात झाला आहे. मुंबई उपनगरात दीर्घ कालावधीच्या सरासरीपेक्षा २० टक्के अधिक पाऊस झाला आहे. तर मुंबई शहरासह ठाणे आणि विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला, वाशीम, गोंदिया व भंडारा या जिल्ह्यात दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत सामान्य पाऊस झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात मात्र सरासरीच्या तुलनेत ३१ टक्क्यांनी कमी पाऊस झाला आहे.
हे ही वाचा…अकोला : छायाकल्प चंद्रग्रहणासह सूपरमूनची पर्वण
इतर राज्यांना पावसाचा कोणता इशारा ?
रविवार, १५ सप्टेंबरला झारखंड, छत्तीसगड या राज्यात, तर १६ सप्टेंबरला पूर्व मध्यप्रदेशात, १७ व १८ सप्टेंबरला पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १५ व १६ सप्टेंबरदरम्यान बिहार, झारखंड, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपूरा या राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १८ ते २० सप्टेंबरदरम्यान आसाम आणि मेघालयमध्ये अशीच परिस्थिती राहील. आज, ११ राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगडमध्ये आज रेड अलर्ट देण्यात आला आहे.