नागपूर : भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये मी याआधीही सहभागी झाली आहे. मात्र, १०८व्या विज्ञान काँग्रेसची संकल्पना ही महिलांना समर्पित असणे ही या कार्यक्रमाची विशेषत: आहे. यामुळे भारतीय महिलांना संशोधनाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी बळ मिळेल, असा विश्वास नोबेल विजेत्या शास्त्रज्ञ प्रा. अॅडा योनाथ यांनी व्यक्त केला.
विज्ञानाचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय विज्ञान काँग्रेसचा शनिवारी नागपुरात समारोप झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे आयोजित विज्ञान काँग्रेसच्या समारोपीय कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे आदी मान्यवर उपस्थित होते. देशभरातील वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करताना योनाथ यांनी मानवी शरीरातील रायबोजोमची संरचना शोधण्याच्या ध्येयाने प्रेरित होवून दक्षिण व उत्तर ध्रुवावरील प्राण्यांचा अभ्यास व त्यातील रोमहर्षक किस्से सांगितले. त्यांनी लावलेला शोध आजही अनेक शास्त्रज्ञांना कसा कामात येत आहे याची माहिती दिली. त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये आज पीएच.डी. झालेले काही भारतीय संशोधनाचे काम करत आहेत. यात तनाया बोस या विद्यार्थिनीचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे माझा भारताशी फार जवळचा संबंध असून भारतीय विज्ञान काँग्रेस ही वैज्ञानिकांसाठी एक पर्वणी असल्याचे त्या म्हणाल्या. डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी या विज्ञान काँग्रेसमधून मिळवलेल्या ज्ञानाचा वापर देशाला महासत्ता बनवण्यासाठी करावा.
भारतीय विज्ञान काँग्रेसचे स्थानिक सचिव डॉ. खडेकर यांनी स्वागतपर भाषणातून कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनच्या वतीने विविध पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. १०९व्या इंडियन सायन्स काँग्रेससाठी डॉ. अरिवद सक्सेना यांची निवड करण्यात आल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.