जग करोना महामारीच्या विळख्यात सापडला असताना करोना लसीसाठी आवश्यक असणारा कच्चा माल पुरवण्यास अमेरीकेने नकार दिला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप केल्याने आपल्याला कच्चा माल मिळाला. आपले शास्त्रज्ञ आणि औषधनिर्मात्या कंपन्यांनी तयार केलेली लस संपूर्ण देशभर मोफत पुरवली गेली आणि १०६ देशांनाही देण्यात आली. ही क्षमता भारतातील औषधनिर्मात्या कंपन्यांमध्ये आहे. भविष्यात जगाला औषधांचा पुरवठा करणारे केंद्र होण्याची भारतामध्ये क्षमता असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हेही वाचा- “तिसरे इंजिन मनसेचे की राष्ट्रवादीचे हे एकनाथ शिंदेंना स्पष्ट करू द्या”; प्रकाश आंबेडकरांचा टोला
७२ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसच्या समारोपीय सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात तीन दिवस चाललेल्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस देशभरातील औषध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत समारोप झाला. यावेळी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट्सचे अध्यक्ष जगन्नाथ एस. शिंदे, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोंटूकुमार पटेल, ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनचे सल्लागार डॉ. राजेंद्र काकडे, संयोजक डॉ. प्रमोद खेडेकर आदींची उपस्थिती होती. औषधनिर्मात्या कंपन्यांनी नागपूर मिहानमध्ये गुंतवणू करावी. त्यांना आवश्यक असणारी मदत सरकारतर्फे केली जाईल असे आवाहन फडणवीस यांनी केले.