नागपूर : नवी दिल्ली- नागपूर विमान उड्डाणाची वेळ झाली. प्रवासी आपल्याला जागेवर बसले, पण विमान उडेच ना. त्यामुळे प्रवासी संतापले. तेव्हा सांगण्यात आले वैमानिक अजून आले नाही. वैमानिक वेळेत न आल्याने इंडिगोचे विमान नागपुरात पावणे दोन उशिरा पोहोचले.
६६०१ नवी दिल्ली ते नागपूर विमान गुरुवारी रात्री ७.५० ऐवजी रात्री पावणे दहा वाजता उडले. कारण, काय तर या विमानाचे वैमानिक हैदराबादहून दिल्ली वेळेत पोहचले नाही. अशाप्रकारे इंडिगो कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा फटका प्रवाशांना बसला. त्यांनी संताप व्यक्त केला.दिल्लीची वाहतूक समस्या पाहता सर्व प्रवासी दिल्ली विमानतळावर सायंकाळी ५ वाजता पोहोचले. सर्व प्रवासी सायंकाळी साडेसात वाजता विमानात बसले. परंतु वैमानिक कर्तव्यावर आले नाही. सर्व प्रवासी चिंतित होते. ते हवाई सुंदरीला वारंवार विचारणा करीत होते. हवाई सुंदरीने वैमानिक हैदराबादवरून येत असल्याचे सांगितले. वैमानिक हैदराबादवरून रात्री ९.३५ वाजता आले. विमान पावणे दहा वाजता दिल्लीवरून नागपुरात उडाले. हे विमान नागपूरला रात्री सव्वा नऊ वाजता पोहचण्याची वेळ असताना रात्री उशिरा ११ वाजता पोहचले.
हेही वाचा >>>‘स्क्रब टायफस’चा धोका वाढला, यवतमाळमध्ये १० रुग्ण…
इंडिगो कंपनीचा हा हलगर्जीपणा आहे. त्याच्या या कृत्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास झाला. एखादा प्रवासी वेळेवर पोहचू न शकल्यास त्याला विमानात प्रवेश नाकाराला जातो. परंतु वैमानिकामुळे पावणे दोन तास उशीर झाला असून याला जबाबदार कोण? इंडीगो कंपनीने याचा खुलासा करावा, अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली.