मेयोतील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे संशोधन
पडित विहिरी, तुंबलेल्या गटारांसह विविध खड्डे वा टँकमध्ये निर्माण होणाऱ्या वायूमुळे गुदमरून होणाऱ्या मानवी मृत्यूवर नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)च्या न्यायवैद्यकशास्त्र विभागात एक संशोधन झाले. त्यात हा वायू मानवी शरिरातील पेशी मारत असल्याने मेंदूतील प्राणवायूचा पुरवठा खंडित होऊन हे मृत्यू होत असल्याचे पुढे आले. न्यायवैद्यकशास्त्राचे प्रा.डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले हे संशोधन इंडियन जर्नल ऑफ फॉरेंसिक मेडिसिन अॅन्ड टॉक्सिकॉलॉजीच्या जर्नलमध्येही प्रकाशित झाले, हे विशेष.
भारतासह जगभरात मोठय़ा प्रमाणावर पडित विहिरी, तुंबलेल्या व कुजलेल्या गटारी, कमी वापराच्या पाण्याच्या टाक्या, घरातील शौचालयांच्या टाक्या आढळतात. त्याच्या स्वच्छतेसाठी अनेकदा कामगारांना यात उतरवले जाते. यानंतर त्यांचा जीव गुदमरून काहींचा मृत्यूही होतो. हे मृत्यू शरिरातील नेमक्या कोणत्या बदलांमुळे होतात, त्यासाठी येथे दोन शवविच्छेदनासाठी आलेल्या व असल्या पद्धतीने मृत्यू झालेल्या दोन अन्य मृतदेहांचा अभ्यास करण्यात आला.
त्यात एका मेनहोलमध्ये पडून मृत्यू झालेल्या ३२ वर्षीय तरुणासह सेफ्टीक टँकमध्ये पडून मृत्यू झालेल्या ४० वर्षीय मृतदेहाचा समावेश होता. हा वायू निर्माण होत असलेल्या वेगवेगळ्या वास्तूंचाही डॉक्टरांनी अभ्यास केला. त्यात कामगार अशा ठिकाणी उतरल्यास त्यांना प्रथम तेथे कुजलेल्या अंडय़ासदृष्य वास येतो. तो श्वसनमार्गे शरिरात जाऊन थेट वेगवेगळ्या पेशींवर हल्ला करतो. या पेशी वायूच्या तीव्रतेनुसार मृत पावतात. या प्रक्रियेत शरीरात ऊर्जा निर्माण करणाऱ्या ‘मायटोकॉड्रियल’चा प्रभाव अचानक कमी होऊन मानवाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे मानवी मेंदूला होणारा प्राणवायूचा पुरवठा खंडित होतो. सोबत रक्तातील प्राणवायूचेही प्रमाण कमी होते.
त्यामुळे मृत्यू होतो. हा वायू ५०० पीपीएम (पार्ट्स पर मिलियन) तिव्रतेचा असल्यास सुमारे ५ ते १० मिनिटातच बेशुद्ध होऊन मृत पावू शकतो. १००० पीपीएम तिव्रतेचा असल्यास त्याचा त्वरित मृत्यू होण्याची शक्यता असते. या व्यक्तीचा मृत्यू होण्यापूर्वी त्याच्या फुफ्फुसाला सूज येऊन शरिराच्या इतरही काही भागांवर परिणाम होत असल्याचे शवविच्छेदन प्रक्रियेदरम्यान निदर्शनात येते. याप्रसंगी मृतदेहातून लघवी, रक्त, स्नायू, थाययोसल्फेटचे नमुने घेऊन ते न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवले जातात. त्या अहवालातून हा मृत्यू असल्या पद्धतीच्या वायूमुळे झाल्याचे निदर्शनात येते.
पडित विहिरी, तुंबलेल्या गटारातील वायू मानवी पेशी मारत असल्याने मृत्यू
वायू मानवी शरिरातील पेशी मारत असल्याने मेंदूतील प्राणवायूचा पुरवठा खंडित होऊन हे मृत्यू होत असल्याचे पुढे आले
Written by महेश बोकडे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-04-2016 at 03:20 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indira gandhi government medical college and hospital research on human death