नागपूर: विधानसभा निवडणूकीपूर्वी राज्यात विभाग निहाय महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रमातून पुराव्यानिशी राज्यात किती परकीय गुंतवणूक आली, किती उद्योग सुरू झाले, किती रोजगारांची निर्मिती झाली याची माहिती सादरीकरणाद्वारे दिली जात आहे. शुक्रवारी नागपुरातील कार्यक्रमातही लाडकी बहीण योजनेचे सादरीकरण झाले. उद्योगाशी संबंधित कार्यक्रमात या योजनेच्या सादरीकरणावर खुद्द उदय सामंत यांनी भाष्य केले आहे.

नागपुरातील हाॅटेल सेंटर पाॅईंटमध्ये शुक्रवारी महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रमात उदय सामंत सहभागी झाले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत म्हणाले, राज्यात विभाग निहाय महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रम घेतला जात आहे. आज नागपुरात हा कार्यक्रम झाला. त्यात आम्ही पुराव्यानिशी राज्यात किती परकीय गुंतवणूक आली, किती उद्योग सुरू झाले, किती रोजगारांची निर्मिती झाली याची माहिती देत आहोत. त्याचे सादरीकरण केले जात आहे.

हेही वाचा : नागपूर : ती ‘फाईल’ बंद! नागपूर विमानतळाबाबत सर्वोच्च न्यायालयाने…

दरम्यान नागपुरातील कार्यक्रमात लाकडी बहीण योजनेचेही सादरीकरण झाले. परंतु त्याला एक कारण आहे. या योजनेतून महिलांना सातत्याने ४६ हजार कोटी रुपये मिळणार आहे. ही रक्कम विविध वस्तू खरेदीसह इतर पद्धतीने शेवटी बाजारातच येणार आहे. त्यातूनही राज्यातील सर्वच उद्योगांची उलाढाल वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच या कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेचे सादरीकरण होत आहे. त्यामागे राजकारण नाही. परंतु विरोधी पक्षाकडून या लाडकी बहीण योजनेच्या सादरीकरणावरही राजकारण होण्याची शक्यता नकारता येत नाही, असेही उदय सामंत म्हणाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीपूर्वीही विरोधकांनी संविधान बदलले जाणार, मुस्लिमांना देशाबाहेर काढले जाणारसह इतर अनेक चुकीच्या माहिती पसरवल्या होत्या. हे सर्व खोट होत, हे आता नागरिकांना समजल्या आहे. महाराष्ट्राची उद्योग भरारीतून सरकार नागरिकांना वास्तविकतेत उद्योगाबाबत राज्याची प्रगती कशी झाली? हे सांगत आहे. दरम्यान राहूल गांधी यांच्या विदेशात संविधानावर दिलेल्या वक्तव्याचाही उदय सामंत यांनी यावेळी समाचार घेतला.

महायुतीमध्ये सहभागी पक्षांची ही प्राथमिकता

महायुतीमध्ये सहभागी असलेल्या भाजप, शिवसेना, अजीत पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्याच पक्षाला आपल्याला विधानसभेत जास्तीत- जास्त जागा मिळाव्या व आमचाच मुख्यमंत्री बनावा असे वाटते. परंतु महायुतीच्या सगळ्याच पक्षांनी प्रथम विधानसभा निवडणूक जिंकून राज्यात सत्तेवर येण्याचे निश्चित केले असल्याचेही उदय सामंत म्हणाले.

हेही वाचा : चंद्रपूर: घुग्घुसवासियांचा श्वास प्रदूषणामुळे गुदमरणार

शिवराळ भाषेतून प्रसिद्धीचा काहींचा प्रयत्न

राज्यात रोज सकाळी ९.३० वाजता प्रसिद्धीमाध्यमांपुढे येऊन शिवराळ भाषा वापरून काही जण प्रसिद्धीचा प्रयत्न करत असतात. त्यांना टीआरपी मिळवण्याची हाऊस असते, असे सांगत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोला लावला.