रेल्वे सुविधा आणि आर्थिक स्थिती याचा ताळमेळ बसत नसल्याने मध्य रेल्वेने नागपूरसह विदर्भातील चार रेल्वेस्थानक सार्वजनिक-खासगी भागीदारीतून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’ मागवण्यात आलेल्या असून रेल्वे स्थानकांचा चेहरा बदलण्याची योजना आहे.
प्रवाशांची वाढती संख्या आणि रेल्वे स्थानकांवरील सुविधांवरील वाढता ताण लक्षात घेता रेल्वेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पुरवणे अशक्य आहे. यामुळे काही निवडक रेल्वेस्थानकावर दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्यासाठी मध्य रेल्वेने स्वारस्य निविदा आमंत्रित केल्या आहेत. तत्कालिन रेल्वेमंत्री लालुप्रसाद यादव यांनी नागपूर रेल्वेस्थानकाला ‘वर्ल्ड क्लास स्टेशन’ म्हणून विकसित करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर रेल्वे खात्यात अनेक बदल झाले. रेल्वे राजकारणात अडकली. त्यामुळे जागतिक दर्जाचे रेल्वेस्थानक नागपूरकरांना स्वप्नवत वाटू लागले आहे. आता केंद्र सरकारने रेल्वेची आर्थिक स्थिती बघता रेल्वेत खासगी गुंतवणूक वाढवण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपूर रेल्वेस्थानकाचा सार्वजनिक-खासगी भागीदारीतून चेहरा-मोहरा बदलण्याची योजना रेल्वेची आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयाने स्वारस्य निविदा मागवल्या आहेत. त्यात नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि बल्लारपूर रेल्वेस्थानकाला विकसित करण्यासाठी निविदा आमंत्रित करण्यात आल्या आहेत. मुख्यालयाला निविदा प्राप्त झाल्या आहेत. ही प्रक्रिया अगदी प्राथमिक अवस्थेत आहे, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील म्हणाले.
प्रवासी सुविधा वाढण्याचा आधीही प्रयत्न झाले आणि योजनाही आखण्यात आल्या. परंतु त्या योजना बारगळल्या. र्सवकष आराखडा आखून कामे न होता किरकोळ कामे झाली. नागपूर रेल्वेस्थानकाला जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज करण्यात येणार होते. त्यासाठी ‘पीपीपी’ मॉडेल वापरण्यात येणार होते. बेल्जियम रेल्वे आणि भारतीय रेल्वेत करार देखील झाला. मात्र प्रत्यक्षात काही घडलेच नाही. त्यानंतर आदर्श रेल्वेस्थानकाची कल्पना मांडण्यात आली. त्यानुसार देशातील काही निवडक रेल्वेस्थानकावर जुजबी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. आता रेल्वेस्थानकांवरील प्रवासी सुविधांचा स्तर उंचावण्याची आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. याअंर्तगत ‘ए-१’ आणि‘ ए’ श्रेणीतील रेल्वेस्थानकाचा सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकास करण्यात येणार आहे. या योजनेत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर रेल्वेस्थानकासह चंद्रपूर, वर्धा, बल्लारशहा आणि बैतुल रेल्वेस्थानकांचा समावेश आहे.
सार्वजनिक खासगी भागीदारीतून रेल्वेस्थानकाला पुनर्विकसित करण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. योजना कार्यान्वित झाल्यावर प्रवाशांना सुविधा मिळतील, शिवाय स्थानकांचा चेहरामोहरा बदलेल, असेही पाटील म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा