* जनमंचकडून महाराणा प्रताप चौक ते छत्रपती चौक मार्गाचे ऑडिट * गिट्टी निघाली, जागोजागी खड्डे, पेव्हर ब्लॉक निकृष्ट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातील महाराणा प्रताप चौक ते छत्रपती चौक मार्गावरील नवीन सिमेंट मार्गावर जागोजागी खड्डे, अनेक भागात गिट्टी बाहेर येणे, रस्त्यांना भेगा पडणे, रस्त्या व फुटपाथच्या मधील जागा ओबडधोबड सोडणे, सांडपाण्याची वाहिनी ब्लॉक असण्याचा प्रकार पुढे आला आहे. शहरातील निकृष्ट सिमेंट रस्त्याचा हा उत्तम नमुना असल्याचे जनमंचकडून पब्लिक ऑडिटमधून शनिवारी पुढे आले.
अभिताभ पावडे, अॅड. अनिल किलोर यांच्या नेतृत्वात झालेल्या अंकेक्षणात या नवीन रस्त्यांना अनेक भागात काही महिन्यातच तडे जाणे, त्याची तात्पुरती मलमपट्टी करून ते बुजवल्या जाणे, अनेक ठिकाणी ‘पेव्हर ब्लॉक्स’ (गट्टू) तुटलेले असून काही भागात ते टाकलेले नसणे, ‘पेव्हर ब्लॉक’ निकृष्ट असणे, रस्ते अनेक ठिकाणी उबडधोबड असणे, अनेक भागात वरचे सिमेंट निघून गिट्टी बाहेर असणे, त्यावरून जास्त वजनाचे ट्रक गेल्यास ते निघून तेथे खड्डे पडण्याची शक्यता असल्याचे पुढे आले. या मार्गावर रस्ते उंच आणि घर खाली असून येथील जवळपास सगळ्याच सांडपाण्याच्या लाईन तुंबलेल्या आहे. तेव्हा पहिल्याच पावसात पाणी शेजारच्या घरात तुंबून सामान्यांना प्रचंड मन:स्ताप होण्याचा धोका आहे.
रस्त्यावरील ‘यू टर्न’च्या मार्गावर खड्डे आहे. अनेक ठिकाणी फुटपाथ व रस्त्याच्या मधील ‘पेव्हर ब्लॉक’ नसून ६ इंचपर्यंत रस्त्याची पातळी बरोबर नसल्यामुळे अपघात वाढले आहे. येथे दंतचे काही रुग्णालये असून तेथे रस्त्यावर ‘पेव्हर ब्लॉक’ नसल्यामुळे खड्डय़ातून रुग्णालयात व उपचारानंतर बाहेर पडताना रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. दोन रस्त्याच्या मधील तयार केलेल्या सिमेंटच्या दुभाजकांतील कामही निकृष्ट आहे. प्लास्टिकच्या पेनने हे सिमेंट निघत असल्याचे चित्र आहे. रिंग रोडवरून वीर सावरकर मार्ग व कोतवाल नगरला जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे असून येथेही अपघात वाढले असल्याचे ऑडिटमध्ये पुढे आले. याप्रसंगी जनमंचचे मोहन पांडे, शरद पाटील, आशुतोष दाभोळकर उपस्थित होते.
अधिकारी बेपत्ता, रात्री रस्त्यावरील भेगा बुजवल्या
महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळाच्या अखत्यारित हा मार्ग येत असल्याने जनमंचकडून मुख्य अभियंत्यांना पब्लिक ऑडिटच्या वेळी येथे उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली. परंतु त्यांनी सपशेल नकार दिला. त्यातच येथील कंत्राटदारांशी चर्चा करण्याच्या सल्ला त्यांच्याकडून मिळाला. दरम्यान, रात्री जनमंचकडून पल्बिक ऑडिट होणार असल्याचे कळल्यामुळे अनेक रस्त्यांवरील भेगा कंत्राटदाराकडून तडकाफडकी बुजवण्याचे प्रयत्न झाले. शासकीय अधिकारी नसल्यामुळे त्यांची बाजू कळू शकली नाही, असे मत अॅड. अनिल किलोर यांनी व्यक्त केले. दरम्यान, त्यांनी सांडपाण्याच्या वाहिन्या तुंबून सामान्यांना त्रास झाल्यास अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याचे आवाहन नागरिकांना करत त्याकरिता जनमंच मदत करणार असल्याचे जाहीर केले.
दोष कंत्राटदारांचा पण, नागरिकांना चालान
जनमंचला या मार्गावर कंत्राटदाराने रस्ता पूर्ण केला नसून अनेक भागात रस्ते व फुटपाथला जोडणाऱ्या भागातील कामे अपूर्ण असल्याचे निदर्शनात आले. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर वाहने लावावी लागत आहे. परंतु येथे वाहने लावताच वाहतूक पोलिसांकडून मात्र चालान केल्या जात असून अनेक नागरिकांना तीन ते चार चालान मिळाल्याचे पुढे आले.
दम्याचा धोका वाढला
रस्त्यावर अनेक ठिकाणी मातीचे ढीग असून वारा सुटताच ती उडून नागरिकांच्या डोळ्यासह श्वसनमार्गे नाकात जाते. तेव्हा या मार्गावर अपघातासह सर्वसामान्यांना दम्याचा आजार वाढण्याचा धोका वाढल्याचे जनमंचच्या निदर्शनात आले.
पालकमंत्र्यांचे नातेवाईक कंत्राटदार
जनमंचच्या योगेश नागपुरेसह काही सदस्यांनी हे काम नागपूरचे पालकमंत्र्यांच्या नातेवाईकांच्या कंत्राटदाराकडे असल्याचे सांगत त्यावर कारवाई होणार काय? याबाबत साशंकता व्यक्त केली. त्यातच वाहतूक पोलिसांच्या नोंदीत खामला चौक ते छत्रपती चौक दरम्यानचे काम हे आरपीएस इंफ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे असून त्याचे कंत्राटदार आर.पी. शाह यांना दाखवल्या गेले आहे.