चंद्रपूर: पर्यावरणाचे संतुलन बिघडल्याने २००० ते २०२२ या बावीस वर्षाच्या कालखंडात जगात प्रदूषणबळींचे प्रमाण ३०० पटीने वाढले आहे. प्रदूषण, पर्यावरणाचे संतुलन बिघडल्याने तसेच बदललेल्या जीवनशैलीमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले असल्याची माहिती राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. वन अकादमी येथे आयोजित ३५ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन कार्यक्रमात बोलताना वनमंत्री मुनगंटीवार यांनी पर्यावरणात कशा प्रकारे बदल होत आहेत, याची माहिती दिली.
आज जग ग्लोबल वार्मिंगचा सामना करीत आहे. पर्यावरणाचा अतिशय झपाट्याने ऱ्हास होत आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडल्याने जागतिक पातळीवर चिंताजनक वातावरण आहे. त्यात भारत अग्रस्थानी आहे. पर्यावरणाच्या बदलामुळे तसेच प्रचंड मोठ्या प्रमाणात होत असलेल्या प्रदूषणामुळे २००० ते २०२२ या बावीस वर्षाच्या कालखंडात ३०० पट मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. केवळ मृत्यूचे प्रमाणच वाढले नाही तर आज कर्करोगाचा आजार बळावत असल्याबद्दल देखील त्यांनी चिंता व्यक्त केली.
आज प्रत्येकाच्या कुटुंबात कर्करोगाने ग्रस्त एक तरी रुग्ण सापडतोच, ही अतिशय गंभीर बाब आहे. प्रदूषणाचे वाढते प्रमाण, बदलत चाललेले पर्यावरण संतुलन आणि मनुष्याची बदललेली जीवनशैली, त्याच प्रमाणे मनुष्याच्या खाण्यातील बदललेले खाद्यपदार्थ याचाही परिणाम झाला आहे. त्यामुळेही कर्करोग पसरत असल्याची माहिती आपल्याला टाटा कॅन्सर हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी दिल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. चंद्रपुरात शंभर कोटींचे टाटा कॅन्सर हॉस्पिटल तयार झाले आहे. बदलत चाललेल्या पर्यावरणाची माहिती सर्वप्रथम पशुपक्ष्यांना होते. टर्की येथे झालेल्या भूकंपाची नोंद सर्वप्रथम पक्ष्यांनीच त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून घेतली होती. भूकंपानंतर पक्ष्यांचे असंख्य व्हिडिओ सार्वत्रिक झाले होते. तेव्हा पर्यावरणासोबतच पशुपक्ष्यांचीही काळजी घ्या, असे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले.