नागपूर : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर रंग, माती, सजावटीच्या वस्तू आणि कारागिरांचा खर्च वाढल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेश मूर्तींच्या किंमती १५ ते २० टक्क्यांनी महागलेल्या आहे. विशेष म्हणजे, यावेळी अडीच ते तीन लाख मातीच्या मूर्तीची मागणी असताना त्या प्रमाणात माती उपलब्ध नसल्यामुळे मूर्तिकारांचीही अडचण झाली आहे. दोन वर्षानंतर आता गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सव दहा दिवसांवर आला असताना मूर्तिकारांचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. गणेश भक्तांसह जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला आहे. मात्र, दिवसेंदिवस अत्यावश्यक वस्तूंसह सर्वच वस्तूंच्या किमती वाढत आहेत. याचा परिणाम गणेश उत्सवावरही झाला आहे.

यंदा गणेश मूर्ती तयार करताना लागणारी माती, रंग व कारागिरांचा खर्च वाढला आहे. तसेच वाढत्या महागाईचा परिणामही गणेश मूर्तींच्या किंमतीवर झाला आहे, असे मूर्तिकार नितीन इंगळे यांनी सांगितले. गेल्यावर्षी गणेशोत्सवावर करोनाचे सावट असल्यामुळे गणेश भक्तांमध्ये उत्साह कमी होता. त्याचबरोबर याचा अंदाज घेऊन मूर्तिकारांनी मूर्ती कमी केल्या होत्या. मात्र, दोन महिन्यापूर्वी मूर्तीवरील आणि उत्सवावरील निर्बंध हटवण्यात आल्यामुळे मूर्तीची मागणी वाढली. त्यामुळे यावर्षी शहर व जिल्ह्यातील पारंपारिक मूर्तिकारांनी दुप्पटीने गणेश मूर्ती वाढवल्या आहेत. यामुळे बाजारामध्ये विविध प्रकारच्या मूर्ती बघायला मिळणार आहे.

गेल्यावर्षी माती ७० रुपये किलो मिळत होती. मात्र, यावर्षी तिच्या किंमतीमध्ये वाढ होऊन आता ती २०० रुपये किलो मिळत आहे. त्यासोबतच रंगाची बकेट ४ हजार ५०० रुपयांना मिळत होती. ती आता साडेपाच हजार रुपये प्रमाणे मिळत आहे. यासोबतच कारागिरांच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम गणेश मूर्तींच्या किंमतीवर झाला आहे. गणेश मूर्तींची आणि अन्य सजावटीच्या वस्तूंची किंमत वाढल्यामुळे सामान्य नागरिकांना व मंडळांना त्याचा आर्थिक फटका बसणार आहे.

Story img Loader