महेश बोकडे, लोकसत्ता
नागपूर: देशभरातील अपंगांना हाताळणाऱ्या मनुष्यबळाला विविध शिक्षण व प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय पुनर्वसन परिषदेकडून लवकरच ‘भ्रमणध्वनी ॲप’ विकसित केले जाणार आहे. त्यामुळे अपंगांशी संबंधित शिक्षण आणि प्रशिक्षणाची माहिती या क्षेत्रातील मनुष्यबळाला एका ‘क्लिक’वर मिळेल.
केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारित असलेल्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाकडून अपंगांशी संबंधित मनुष्यबळाला प्रशिक्षण व शिक्षण देण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागात विविध संस्था उभारल्या जातात. या संस्थांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना द्यायच्या शिक्षणासाठीचे अभ्यासक्रम व निकष ठरवले जातात. या शिक्षणानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना अपंगांशी संबंधित विविध कामे करावी लागतात.
आणखी वाचा-ठाकरेंच्या कार्यकाळात पायाभूत प्रकल्पांकडे दुर्लक्ष, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आरोप
अपंगांशी संबंधित शिक्षणाला विशेष महत्त्व असून या उपक्रमासाठी केंद्र सरकारकडून वेळोवेळी देशभरात विविध कार्यशाळा, परिषदाही घेतल्या जातात. मात्र, एखाद्या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रश्न उद्भवल्यास ती सोडवण्यासाठी विलंब होतो. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भारतीय पुनर्वसन परिषदेने पुढाकार घेतला आहे. परिषदेकडून केंद्र सरकारशी समन्वय करून एक भ्रमणध्वनी ‘ॲप’ विकसित केला जाणार आहे. या ‘ॲप’वर अपंगांशी संबंधित मनुष्यबळाच्या सगळ्या शिक्षण- प्रशिक्षण व यासंबंधित माहिती उपलब्ध राहील. सोबत कुणालाही केव्हाही काही समस्या उद्भवल्यास ते ॲपच्या मदतीने प्रश्न विचारून त्याची उत्तरे तज्ज्ञांकडून मिळवू शकतील. भारतीय पुनर्वसन परिषदेने नुकतेच नियमात काही बदल केले असून त्यात या भ्रमणध्वनीवरील ॲपबाबत माहिती दिली गेली आहे.
भारतीय पुनर्वसन परिषदेने देशातील ३० राज्यांमध्ये अपंगांशी संबंधित विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मनुष्यबळाच्या प्रशिक्षणासाठी ६८१ प्रशिक्षण केंद्रांना मंजुरी दिली आहे. या सर्व केंद्रांसाठी नवीन भ्रमणध्वनी ‘ॲप’ महत्त्वाचा ठरणार आहे. -अभिजित राऊत, समन्वयक, नागपूर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र.