नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे महाल भागात निवासस्थान आहे. याच घरात हेडगेवार यांचा १ एप्रिल १८८९ रोजी जन्म झाला. त्याच घरात संघानेही जन्म घेतला. डॉक्टरांचे निवासस्थान स्वयंसेवकांचे श्रद्धास्थान असून ऐतिहासिक वारसा म्हणून त्याकडे बघितले जाते. घराची रचना जुन्या वाड्यासारखी आहे. तेथेच १९२५ साली विजयादशमीला संघ स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. ही वास्तू सध्या संघाच्या मालकीची आहे. निवासस्थानाचा काही भाग मोडकळीस आला असताना त्याची दुरुस्ती करण्यात आली. घरामध्ये प्रवेश केल्यावर डॉक्टरांच्या जीवन कार्याची माहिती देणारा फलक लावण्यात आला आहे.

देश विदेशातून डॉक्टरांच्या निवासस्थानाला भेट देण्यासाठी स्वयंसेवक येत असल्यामुळे महापालिकेच्या वतीने २५ मे २०११ मध्ये निवासस्थान परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले. सध्या घरामध्ये एक स्वयंसेवक राहतो. देश-विदेशातून आलेले स्वयंसेवकांनी या निवासस्थानाची माहिती दिली जाते. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी विजयादशमी कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपूरला आले असताना त्यांनी या निवासस्थानाला भेट दिली होती. डॉ. हेडगेवार हे याच वास्तूत १८८९ ते १९४० पर्यंत राहात होते. मात्र त्यांचा मृत्यू श्रीमंत बाबासाहेब घटाटे यांचा बंगल्यात झाला.

हेही वाचा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाव कसे ठरले माहिती आहे का? आधी या नावावर झाला होता विचार

दाट वस्ती असलेल्या डॉक्टरांच्या घरामध्ये सूर्यप्रकाश व शीतल हवा सतत खेळत राहावी म्हणून भरपूर खिडक्या आहेत. त्यांच्या घराचा आत्मा म्हणजे त्यांचे देवघर. ते तळमजल्याच्या ठिकाणी आहे. समोरच्या बाजूला पुन्हा एक जिना आहे. त्यामुळे एक अंगणातून तर दुसरा माजघरातून जिना आहे. तिसऱ्या मजल्यावर पुन्हा एक अडगळीची खोली आहे त्यात डॉक्टरांच्या बैठकी होत असे. अंगणात तुळशी वृंदावन असून चाफा, कडुलिंब व औंदुबर असे वृक्ष आहेत. घराच्या पूर्वेस एक आऊटहाऊससारखी कौलारु खोली होती. काही काळ याठिकाणी डॉक्टरांचे जावई नानासाहेब देशकर व त्यांचे कुटुंब राहत होते. आता मात्र ही वास्तू संघाच्या मालकीची झाली आहे. डॉक्टरांचे वय ८ वर्षे असताना त्यांना शाळेत ब्रिटिशांकडून मिठाई देण्यात आली होती. ती मिठाई घेऊन घरी आले आणि अंगणातील एका कोपऱ्यात त्यांनी फेकून दिली होती अशीही आठवण आहे.

हेही वाचा – प्रकाश आंबेडकरांवर दिवसभर विश्रामगृहातच बसून राहण्याची नामुष्की, काय नेमके घडले?

जुन्या वस्तूंचे जतन

जुनी छायाचित्रे, ते वापरत असलेल्या दैनंदिन उपयोगाच्या वस्तू उदा. आरसे, कपडे वाळत घालण्याच्या दांड्या, पाळण्याचे हलगे, इत्यादी जुन्या वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.