महेश बोकडे, लोकसत्ता 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : वैद्यकीय शिक्षण खात्याने सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील एचआयएमएस सेवा बंद केल्याने येथील ऑनलाइन नोंदी बंद ठप्प पडल्या आहे. परंतु, आता वैद्यकीय शिक्षण खात्याने आरोग्य विभागाच्या सॉफ्टवेअरशी स्वत:चे नवीन प्रस्तावित सॉफ्टवेअर जोडण्याबाबत चाचपणी केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास या दोन्ही खात्यातील रुग्णालयांतील रुग्णांची माहिती कोणताही शासकीय डॉक्टर एका क्लिकवर बघू शकेल.

राज्यात सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण खाते या दोन विभागांची वेगवेगळी शासकीय रुग्णालये आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांत कमी गंभीर रुग्ण उपचाराला येतात.  गंभीर रुग्ण टर्शरी दर्जाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जातात. येथे दाखल होणारे अनेक रुग्ण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयातूनच तिकडे जातात. परंतु, दोन्ही खात्याचे वेगवेगळे सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयातून शासकीय वैद्यकीय रुग्णालयांत हलवलेल्या गंभीर रुग्णाचा इतिहास वैद्यकीय शिक्षण खात्यातील डॉक्टरांना माहीत नसतो. त्यामुळे या गंभीर रुग्णाच्या निदानाची प्रक्रिया नव्याने करावी लागते. त्यामुळे वेळ वाया जातो. ही बाब लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण खात्याकडून  एचआयएमएस ही ऑनलाइन रुग्ण नोंदणी प्रक्रियेसाठी निविदा प्रस्तावित आहे. याद्वारे वैद्यकीय शिक्षण खात्याकडून सार्वजनिक आरोग्य विभागाशी समन्वय साधून दोन्ही एचआयएमएस सेवा संलग्न करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे रुग्णांची माहिती वेळेत व अचूक कळू शकेल.

वैद्यकीय शिक्षण खात्याकडून लवकरच नवीन सॉफ्टवेअरची प्रक्रिया पूर्ण होईल.  दोन्ही खात्याच्या रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांची ऑनलाइन माहिती कोणत्याही विभागातील डॉक्टरांना तत्काळ बघून उपचाराची दिशा ठरवता येईल.– सौरभ विजय, सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग, मुंबई.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information about medical health department patients on single click zws