नागपूर : राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली (एचआयएमएस) सेवा जुलै २०२२ मध्ये बंद पडली. तेव्हापासून सर्वत्र ऑनलाईन नोंदणीचा गोंधळ आहे. शासनाने आता ऑनलाईन नोंदणी साॅफ्टवेअरचे काम राष्ट्रीय माहिती केंद्राला (एनआयसी) दिले. त्यामुळे लवकरच राज्यात पुन्हा रुग्णांची माहिती एका ‘क्लिक’वर मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण खात्याची वेगवेगळी शासकीय रुग्णालये आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांत कमी गंभीर तर वैद्यकीय शिक्षण खात्याच्या ‘टर्शरी’ दर्जाच्या रुग्णालयांत अत्यवस्थ रुग्ण दाखल होतात. वैद्यकीय शिक्षण खात्याच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील सर्व रुग्णांच्या नोंदी पूर्वी ‘एचआयएमएस’ प्रणाली यंत्रणेतून ऑनलाईन पद्धतीनेच होत होत्या.

हेही वाचा – वर्धा : बेपत्ता विवाहितेस विकण्याचा डाव, बिहारमधून घेतले ताब्यात

जुन्या यंत्रणेत एक्सरे- एमआरआय, सीटी स्कॅनसह इतरही तपासणीचे अहवाल संबंधिताला अपलोड करावे लागत होते. त्यामुळे डॉक्टर हे सगळे रुग्णांचे अहवाल एका ‘क्लिक’वर कुठूनही बघू शकत होते. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णांवर उपचारात लाभ होत होता. दरम्यान, ‘एचएमआयएस’चे कंत्राट संपल्यावर जुलै २०२२ मध्ये ही यंत्रणा बंद पडली. त्यामुळे सर्वत्र ऑनलाईन नोंदणीचा गोंधळ उडाला. त्यानंतर विविध संस्थांनी त्यांच्या स्तरावर संगणकासह इतर यंत्रणा उभारून काम काढणे सुरू केले. परंतु, वैद्यकीय शिक्षण खात्याने आता या ऑनलाईन नोंदणीसाठी नवीन साॅफ्टवेअर तयार करण्याचे काम ‘एनआयसी’ या सरकारी कंपनीला दिले आहे. त्याचे काम जवळपास पूर्णही झाले आहे. त्यामुळे राज्यभरातील वैद्यकीय आणि शासकीय दंत महाविद्यालयात लवकरच ही सेवा कार्यान्वित होणार आहे. यापूर्वी शासकीय दंत महाविद्यालयात ही सेवा नव्हती. परंतु, आता हे रुग्णालयही या ऑनलाईन नोंदीत घेण्यात आले आहे.

संस्था स्तरावरील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

वैद्यकीय शिक्षण खात्याने ‘एनआयसी’ला ऑनलाईन नोंदणीच्या साॅफ्टवेअरचे काम दिले असतानाच दुसरीकडे प्रत्येक संस्थेतील निवडक अधिकाऱ्यांना हे साॅफ्टवेअर हाताळण्याचे प्रशिक्षणही दिल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकरच ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे.

हेही वाचा – धक्कादायक.. नागपुरात व्यसनी मुलाकडून आईची हत्या, रुमालाने गळा आवळला

वैद्यकीय शिक्षण खात्याच्या रुग्णालयांत लवकरच ‘एनआयसी’च्या साॅफ्टवेअरच्या मदतीने ऑनलाईन नोंदणी सुरू होईल. त्यामुळे या रुग्णांची माहिती राज्यातील कोणत्याही रुग्णालयांत डॉक्टर बघू शकतील. – डॉ. दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय संचालक, मुंबई.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information about patients in government hospitals now on one click mnb 82 ssb